आता सर्वोच्च न्यायालय हाच देशातील आशेचा शेवटचा किरण; इतर संस्था गुलाम : संजय राऊत

मुंबई, २१ फेब्रुवारी २०२३ : शिवसेनेचे नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षपाती पद्धतीने हा निर्णय घेतल्याचे ठाकरे गटाचे म्हणणे आहे. ठाकरे गट केंद्रीय निवडणूक आयोग बरखास्त करण्याची मागणी करीत आहे. सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील राजकीय संकटाबाबत मंगळवारपासून (ता. २१ फेब्रुवारी) सलग तीन दिवस सुनावणी सुरू राहणार आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना या विषयावर आपली प्रतिक्रिया दिली.

संजय राऊत म्हणाले, ‘सर्वोच्च न्यायालय हा देशातील आशेचा शेवटचा किरण आहे. इतर सर्व संस्था गुलामांप्रमाणे कार्यरत आहेत. तसे झाले नसते तर केंद्रीय निवडणूक आयोगाने आमच्यावर अन्यायकारक निर्णय घेतला नसता. सर्वोच्च न्यायालय लोकशाही वाचविण्याचा प्रयत्न करेल, अशी आशा आहे. सत्ता आणि पैशाच्या जोरावर निवडणूक चिन्ह आणि नाव देण्यात आले आहे.

शिवसेनेचे नाव आणि चिन्ह विकत घेतल्याची आज दुसऱ्यांदा पुनरावृत्ती संजय राऊत यांनी केली आणि त्यासाठी २००० कोटींचे पॅकेज देण्यात आले आहे. संजय राऊत म्हणाले, की रेटकार्ड तयार केले आहे. नगरसेवकापासून वरपर्यंत खरेदी-विक्रीसाठी दर निश्चित करण्यात आले आहेत. सत्ताधाऱ्यांचे एजंट ग्रामपंचायत स्तरापर्यंत जाऊन खरेदी-विक्री करीत आहेत.

तत्पूर्वी, संजय राऊत यांनी आज ट्विट करून एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचे एक कोट ट्विट करीत त्यांनी लिहिले, ‘सत्ता एखाद्या व्यक्तीला भ्रष्ट करीत नाही; परंतु जर एखादा मूर्ख सत्तेवर आला तर तो सत्ता भ्रष्ट करतो.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा