बारावी इंग्रजीच्या पहिल्याच पेपरमध्ये बोर्डाने छापलं उत्तर; कॉपीमुक्त अभियानाचा डांगोरा पिटणाऱ्या बोर्डाचा पराक्रम

पुणे, २२ फेब्रुवारी २०२३ : राज्यात महाराष्ट्र बोर्डाची बारावीची परीक्षा मंगळवारपासून (ता. २१) सुरू झाली आहे; मात्र पहिल्याच दिवशी बोर्डाचा भोंगळ कारभार दिसून आला आहे. इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्नच छापून आला नाही; मात्र त्याऐवजी थेट उत्तर छापण्यात आले आहे. त्यावरून विद्यार्थ्यांमध्ये मोठा गोंधळ उडाला होता. यानंतर चुकीच्या प्रश्नांबाबत विद्यार्थ्यांना बोर्डाकडून ६ गुण मिळावेत, अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून होत आहे. महाराष्ट्र बोर्डाने फेरपरीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांचा वेळ वाया जाईल, असे पालकांचे म्हणणे आहे . पुन्हा तयारी करावी लागेल आणि त्याचा परिणाम भविष्यातील परीक्षांवर होईल. दरम्यान, प्रश्नपत्रिकेतील या घोळामुळे विद्यार्थ्यांना सहा गुणांची लॉटरी लागणार का, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. तर, बोर्डाने या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे म्हटले आहे.

महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षेला सुमारे १४.५० लाख विद्यार्थी बसले आहेत. यामध्ये सुमारे ८ लाख विद्यार्थी आहेत, उर्वरित मुली आहेत. त्याचवेळी पेपरफुटीचे प्रकरणही समोर आले आहे. महाराष्ट्रातील यवतमाळ येथील मुकुटबन परीक्षा केंद्रावर पेपरचे वाटप होताच १० मिनिटांत बाहेरील लोकांच्या मोबाईलवर ते पेपर फिरू लागले. केंद्राचे प्रभारी आणि इतर दोघांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र मंडळातर्फे यंदा राज्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी मंडळाकडून कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. यावर्षी बोर्डाच्या परीक्षेसाठी स्थापन करण्यात आलेल्या मुख्य केंद्रांवरून सर्व परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिका घेऊन जाण्यासाठी व वितरित करण्यासाठी मोबाईल फोनद्वारे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात येत आहे.

मंडळाकडून प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या वाहनांमध्ये जीपीआरएस प्रणालीचा वापर करण्यात येत आहे; तसेच पेपर फुटू नये म्हणून परीक्षा सुरू होण्याच्या दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका वितरित न करून विद्यार्थ्यांना परीक्षा संपल्यावर दहा अतिरिक्त मिनिटे दिली जात आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा