मुंबई, ६ मार्च २०२३ : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या लोकांना एकत्र ठेवणे व एकत्रित निवडणुकीला सामोरे जाणे, याची काळजी घेतली जाईल. महाराष्ट्रातील लोकांना बदल हवाय, असे वक्तव्य ‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. सोमवारी (ता.६) कसब्याचे निवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी पवार यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी पवार म्हणाले की, धंगेकरांच्या यशाबद्दल मला खात्री नव्हती. महाविकास आघाडीच्या पाठिंब्यामुळे यश मिळाले. महाराष्ट्रात फिरत असताना लोक सांगतात की, बदल हवाय आणि या बदलासाठी सर्वांनी एकत्र यावे, अशी लोकांची भावना आहे. आगामी विधानसभा आणि लोकसभेला एक प्रयत्न राहणार, महाविकास आघाडीच्या लोकांना एकत्र ठेवणे व एकत्रित निवडणुकीला सामोरे जाणे याची काळजी घेतली जाईल. पैशांचा वापर हे लोक मान्य करीत नाहीत. हे झालेल्या पोटनिवडणुकीतून दिसले. सगळे एकत्र आल्यास काय होणार आहे. हे कालच्या उद्धव ठाकरेंच्या सभेतील उपस्थितीतून स्पष्ट झाले असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपमध्ये आलेल्यांची चौकशी बंद झाली, असे एकतरी नाव सांगा, असे आवाहन केले होते. यावर बोलताना पवार म्हणाले की, महाराष्ट्रातील एका भाजपच्या नेत्याने प्रश्न विचारला की, ज्याच्यावर केस होती आणि नंंतर चौकशी झाली नाही असे नाव दाखवा. त्याला उत्तर मीच दिलं की, ठाणे जिल्ह्यात कोण होतं, कुणाला अटक करण्याचा निर्णय झाला होता. ते सांगा, अकोला, वाशीममध्ये चौकशी झाली होती. ती आज चालू आहे का तेही सांगा, अशी अनेक नावे सांगता येतील, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर