एक धक्कादायक प्रकार; संगमनेर तालुक्यात दोन दिवसांत पाच तरुणांचा बळी

संगमनेर, २० मार्च २०२३: संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथील तरुणाची मोटारसायकल विहीरीच्या कठड्याला धडकली आणि तरुण उडून विहिरींमध्ये पडला. या घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला तर दुसरीकडे तालुक्यातील मिर्झापूर येथील एका तरुणाचा शेततळ्यात बुडून दुर्देवी मृत्यू झालाय. याबाबत अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथे राहणाऱ्या रवींद्र शिवाजी राहणे वय २६ हा तरुण आपल्या मोटरसायकल वरुन एका कार्यक्रमाला जात असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या विहीरीच्या कठड्याला त्यांची जोरात धडक बसली.

यामुळे हा तरुण दुचाकीवरून उडून विहिरीत पडला आणि पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण चंदनापुरीमध्ये शोककळा पसरली आहे. दुसरीकडं तालुक्यातील मिर्झापूर येथे ऋ्षिकेश राधाकिसन वलवे वय १९ या तरुणाला आज सकाळी पाण्याचा कॉक चालू करण्यासाठी शेततळ्यात गेला असता पाय घसरल्यामुळं तो शेततळ्यात पडला आणि बुडून मृत्यू पावला आहे.

या दोन्ही घटनांबाबत संगमनेर तालुका पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलीय. संगमनेर तालुक्यातील चिखली गावातील तीन तरुणांचा अपघातात मृत्यू झाल्याच्या घटनेला २४ तास उलटत नाही तोच चंदनपुरी आणि मिर्झापूर येथील दोन तरुणांचा दुर्देवी मृत्यू झालाय. त्यामुळं दोन दिवसांत संगमनेर तालुक्यातील पाच तरुणांचा बळी गेलाय. यामुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा