नवी दिल्ली : महिलांवरील वाढत्या लैंगिक अत्याचारांस पॉर्न साइटस् जबाबदार आहेत. केंद्र सरकारने पॉर्न साइटस्वर बंदी घालावी अशी मागणी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शुक्रवारी(दि.६)रोजी केली.
जल- जीवन- हरियाली यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.सभेत उपस्थितांना संबोधित करताना नितीश कुमार यांनी पॉर्न साइटस्मुळे देशातील युवकांमध्ये वाढणाऱ्या मानसिक विकृतीवर चिंता व्यक्त केली.
हैदराबाद येथील डॉक्टर महिलेवर बलात्कार, त्यानंतर बिहार, उत्तर प्रदेश सर्वच ठिकाणी असे निंदनीय प्रकार घडत आहेत.
तंत्रज्ञानाचा फायदा होतो आणि नुकसानही होते. काही लोक तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करतात. पॉर्न साइटस्वर काय चालते? मुली, महिलांचे अश्लील व्हिडीओ पॉर्न साइटस्वर अपलोड केले जातात. असे व्हिडीओ बघून मानसिक विकृती निर्माण होते. तरुणांनी अशा गोष्टींपासून दूर राहिले पाहिजे, असे नितीश कुमार म्हणाले.
अनेक जण आज पॉर्न साइटस्वर बंदीची मागणी करीत आहेत हे योग्यच आहे. मी केंद्र सरकारला पत्र लिहून पॉर्न साइटस्वर पूर्ण बंदी घालण्याची मागणी करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.