पुणे, ३० मार्च २०२३: ग्रामपंचायतींसाठी आता जिल्हा परिषदेने नवीन अँप विकसित केले आहे. ग्रामपंचायत विभागामार्फत करण्यात आलेल्या अँपला एस. एम. जोशी ग्रामविकास अँप नाव देण्यात आले. त्यांचे उद्धाटन ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांनी केले. अँपमुळे प्रशासनाचा वेळ वाचणार आहे. ग्रामपंचायतीच्या कामकाजाची प्रगतीची सध:स्थिती समजणे शक्य होणार आहे.
ग्रामविकासाशी निगडित एस. एम. जोशी ग्रामविकास अँपच्या उद्धाटनाला झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन घाडगे, जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी व सर्व तालुक्यांचे गटविकास अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते. राजेश कुमार यांनी हे अँप शासनस्तरावरून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्याचा विचार करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
आयुष प्रसाद म्हणाले की अँपवर शासनस्तरावरून प्राप्त सर्व शासन निर्णय तसेच शासनाकडील व जिल्हा परिषदेकडील व इतर संबंधित परिपत्रके एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हे जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय कामकाजासाठी उपयुक्त राहील. ग्रामपंचायतीने राबविलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रम कामांबाबत त्यांना या अँपद्धारे प्रसिद्धी देण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर