लवकरच अजित पवार भाजपसोबत जाणार! अंजली दमानियांचा मोठा दावा

मुंबई, १२ एप्रिल २०२३: अजित पवारांची नाराजी दिसून येत असतानाच राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे एक ट्विट अंजली दमानिया यांनी केले आहे. मंत्रालयात कामानिमित्त गेले असता, तिथे एका व्यक्तीने त्यांना १५ आमदार बाद होणार असून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जाणार अशी माहिती दिल्याचे ट्विट त्यांनी केले आहे. तसेच महाराष्ट्राच्या राजकारणाची आणखी किती दूर्दशा होते हे बघू, असे म्हणत त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

अशा परिस्थितीत अंजली दमानिया यांचे हे ट्विट खूप महत्त्वाचे आहे. शिवसेनेच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अद्याप येणे बाकी आहे, त्यात शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवरही निर्णय होणार आहे. त्याच संदर्भात अंजली दमानिया यांच्या ट्विटमुळे १५ आमदार अपात्र ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. अशा स्थितीत शिंदे सरकार अडचणीत येणार आहे, त्यानंतर राष्ट्रवादीचे अजित पवार भाजपसोबत सरकार स्थापन करतील.

दरम्यान, आज (१२ एप्रिल, बुधवार) अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. दुपारी दोन वाजता सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक होणार आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची लवकरात लवकर मदत मिळावी, या मागणीसाठी ही बैठक होत असल्याचे या बैठकीचे कारण सांगितले जात आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा