ओडिशा, १३ एप्रिल २०२३: हनुमान जयंती निमित्त धार्मिक कार्यक्रमादरम्यान आयोजित मोटारसायकल रॅलीवेळी हिंसाचाराची मोठी घटना घडलीय. यामध्ये एक महिला पोलिसासह किमान १० पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. या घटनेनंतर आज ओडिशातील संबळपूर जिल्ह्यात पुढचे ४८ तास इंटरनेट सेवा बंद करण्यात आलीय. तसेच जिल्हा प्रशासनाने संबळपूर शहरातील प्रमुख भागांमध्ये CrPC चं कलम १४४ लागू केलंय.
राज्याच्या गृहविभागाने दिलेल्या अधिसूचनेत म्हटलंय की, कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्यासाठी जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा बंद करण्यात आलीय. हिंसाचारानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रक्षोभक आणि प्रेरित संदेशांचा प्रसार रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलंय. आज सकाळी १० वाजल्यापासून सर्व मोबाईल सेवा इंटरनेट, डेटा सेवा, ब्रॉडबँड आणि सोशल मीडिया सेवा निलंबित राहतील, असंही प्रशासनाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय.
परिस्थिती गंभीर आहे आणि संबळपूरमधील सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवण्यासाठी समाजमाध्यमांद्वारे खोटे आणि प्रक्षोभक संदेश प्रसारित करत आहेत. असं गृह सचिव देवरंजन कुमार सिंग यांनी इंटरनेट सेवांवर तात्पुरत्या बंदीचं समर्थन करताना म्हटलंय. पुढील तपास पोलीस करत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिध: अमोल बारवकर