मुंबई,२६ एप्रिल २०२३ : शाहरुख खानच्या आगामी चित्रपट “जवान” च्या क्लिप रिलीज झाल्यानंतर, दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी सोशल नेटवर्किंग साइट्स आणि इतर असंख्य प्लॅटफॉर्म्सला रिलीज झालेल्या क्लिप्सचे वितरण थांबवण्याचे आदेश दिले. शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांच्या निर्मिती कंपनीने , रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडने याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
या घटनेवर काय आहे दिल्ली उच्च न्यायालयाची भूमिका?
न्यायमूर्ती सी. हरी शंकर यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली उच्च न्यायालयाच्या पॅनेलने युट्युब, गुगल ट्विटर आणि रेडिट या समाजामाध्यमांद्वारे झालेले क्लिप्सचे वितरण थांबवण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश दिले. तसेच अनेक इंटरनेट सेवा प्रदात्यांना चित्रपट सामग्री पाहण्यासाठी किंवा डाउनलोड करण्यासाठी ऑफर करणार्या वेबसाइटवर प्रवेश अवरोधित करण्याचे आदेश दिले आहेत. याचिकाकर्त्याच्या म्हणण्यानुसार, चित्रपटातील दोन प्रसंग सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते, त्यापैकी एक शाहरुख खान युद्धाच्या दृश्यात आणि दुसरा नृत्याच्या दृश्यात होता.
‘लीक झालेल्या व्हिडिओ क्लिप आणि इमेजच्या अशा अनधिकृत वितरणामुळे चित्रपटाच्या जाहिरातीला धोका निर्माण होऊ शकतो आणि चित्रपटगृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित झाल्यावर अशाच प्रकारची अनधिकृत कृत्ये होऊ शकतात.’अशी खंतही खंडपीठाने बोलून दाखवली. ते पुढे म्हणाले की, ‘लीक झालेल्या व्हिडिओ क्लिप कलाकारांचे लूक तसेच चित्रपटातील संगीत देखील समोर आणतात जे चित्रपटाच्या काळजीपूर्वक नियोजित मार्केटिंग धोरणाचा भाग म्हणून मुख्य कालावधीत उघड केले जातात.’
शाहरुखने या चित्रपटामार्फत ऍटलीसोबत पहिल्यांदाच काम केले आहे. गेल्या वर्षी फर्स्ट लूक रिलीज झाला होता आणि त्यामुळे प्रेक्षकांमधील उत्साह द्विगुणित झाला होता. या चित्रपटात नयनतारा, सान्या मल्होत्रा आणि सुनील ग्रोव्हर देखील आहेत, तर दीपिका पदुकोण देखील एका खास भूमिकेत दिसणार आहे अशी चर्चा आहे. हा चित्रपट २ जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी:- ऋतुजा पंढरपुरे