मुंबई, १० मे २०२३: सूर्यकुमार यादव आणि नेहल वढेरा यांच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहा विकेट्स राखून पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ग्लेन मॅक्सवेल (६८) आणि फाफ डुप्लेसी (६५) यांच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर बंगळुरूने २० षटकांत ६ विकेट्स गमावून १९९ धावा केल्या. सूर्यकुमार आणि नेहल यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर मुंबईने हे लक्ष्य १६.३ षटकांत पूर्ण केले. आणि या विजयासह मुंबईने गुणतालेकित मोठी मोठी झेप घेतली.
मात्र, मुंबईला २०० धावांचे लक्ष्य पूर्ण करायचे होते. आणि त्यासाठी त्यांना चांगली सुरुवात करण्याची गरज होती. इशान किशनने येताच जोरदार धावा करायला सुरुवात केली. इशानने २१ चेंडूंत चार चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ४२ धावांची खेळी केली. रोहित शर्माची बॅट पुन्हा शांत राहिली आणि त्याने आठ चेंडूंत केवळ सात धावा केल्या.
यानंतर मुंबईचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव आणि युवा फलंदाज नेहल वढेरा यांनी मुंबईचा डाव सांभाळला. सूर्यकुमारने या मोसमातील चौथे अर्धशतक केवळ २६ चेंडूत पूर्ण केले. या दोघांनी १४० धावांची भागीदारी केली. १६व्या षटकातील चौथ्या चेंडूवर विजय कुमारने सूर्यकुमारचे विकेट घेतले. त्याने ३५ चेंडूंत सात चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने ८३ धावा केल्या. आणि ही त्याची आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या आहे.
नेहलने १७व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर षटकार ठोकून संघाला विजय मिळवून दिला आणि यासह त्याने आयपीएलचे दुसरे अर्धशतक पूर्ण केले. नेहलने ३४ चेंडूंत चार चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद ५२ धावा केल्या.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड