नाशिक, १९ मे २०२३ -: नाशिकमध्ये आयकर विभागाचे धाडसूत्र सुरूच असून, आज पुन्हा एकदा आयकर विभागाने छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. नाशिक शहरातील नामांकित शारदा मोटर्स कंपनीवर आयकर विभागाने छापा टाकला आहे. आज सकाळी आयकर विभागचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक कंपनीत दाखल झाले असून कारवाई सुरु केली आहे.
नाशिक शहरातील सातपूर औद्योगिक वसाहती मध्ये शारदा मोटर कंपनीचे कार्यालय आहे. शारदा मोटर्स कंपनीत चारचाकी वाहनांचे सायलेन्सर आणि एक्सेल बनवले जातात.काही दिवसांपूर्वी शहरातील नामांकित बिल्डर्सवर आयकर विभागाने छापे टाकल्याने शहरात खळबळ उडाली होती. आता शारदा कंपनीवर पडलेल्या छापल्यामुळे, उद्योजकही आयकर खात्याच्या निशाणावर आल्याचे सांगितले जात आहे.
आज सकाळी आयकर विभागातील बड्या अधिकाऱ्यांसह विशेष पथकाने शारदा मोटर्स कंपनीवर छापा टाकला. पथकामध्ये अनेक अधिकारी असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे शहरातील अजूनही काही उद्योजक कंपनीवर छापा टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही. आयकर विभागाकडून या कारवाई संदर्भातील माहिती गुप्त ठेवण्यात आली असून तपशील बाहेर आला नाही.
शारदा कंपनीवर पडलेल्या धाढीमुळे आता बांधकाम व्यवसायिकांनंतर उद्योजकांचे धाबे दणाणले आहेत. आज सकाळी छापा टाकण्यात आला असून नेमकी किती रक्कम हस्तगत करण्यात आली, कारवाईत काय काय मिळाले? कारवाई किती काळ चालणार? नाशिक शहरातील इतर काही उद्योजक रडारवर आहेत? याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर