पुणे २३ मे २०२३:पुणे पीजन मित्र असोसिएशनतर्फे कबुतर उडवण्याच्या स्पर्धेचे वार्षिक पारितोषिक वितरण राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे नवनियुक्त सल्लागार अली दारूवाला यांच्या हस्ते झाले. एकेकाळी निरोप्याची भूमिका पार पाडणाऱ्या कबुतरांची स्पर्धा आकर्षक व कुतूहल जागवणारी आहे. या स्पर्धेला राष्ट्रीय खेळ म्हणून मान्यता मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे असे प्रतिपादन अली दारूवाला यांनी केले.
कबुतर पाळणाऱ्या समूहाची पीजन मित्र असोसिएशन ही देशपातळीवरील एकमेव संस्था आहे. या संस्थेने घेतलेल्या पुणे कॅम्पमधील आशीर्वाद हॉलमधील कार्यक्रमावेळी राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सल्लागारपदी नेमणूक झाल्यानिमित्त अली दारूवाला यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दरम्यान पीजन मित्र संस्थेचे अध्यक्ष व्ही. सत्या, चेन्नई येथील इनकम टॅक्स विभागाचे अरुण कुमार, भाजपचे पुणे संघटन सरचिटणीस गणेश घोष, संस्थेचे अध्यक्ष शैलेंद्र जाधव, उपाध्यक्ष शशिकांत बालवडकर, सचिव सलीम शेख आदी उपस्थित होते.
देशभरात या स्पर्धेबाबत कुतूहल आहे. केरळ, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तमिळनाडू, महाराष्ट्रात अशा स्पर्धा होतात. हा पूर्णपणे एक खेळ आहे. आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करून यासंबंधीच्या स्पर्धा घेतल्या जातात. ही पूर्ण कायदेशीर स्पर्धा आहे. थोडेच पण चांगले पक्षी पाळा. ते यश मिळवून देतील. धान्य सुकवून आणि धुवून स्वच्छ करून पक्षांना खाऊ घालावे. किती किलोमीटरच्या स्पर्धेत कोणता पक्षी उतरावयाचा मालकाला कळणे महत्वाचे आहे. अशी माहितीही आयोजकांनी उपस्थितांना दिली.
पुणे पीजन मित्र असोसिएशनचे अध्यक्ष शैलेंद्र जाधव यांनी या स्पर्धेविषयी बोलताना सांगितले की, या स्पर्धा १५० ते १००० किलोमीटरच्या असतात. इतक्या प्रदीर्घ अंतरात पक्षी ठरलेल्या वेळेत जाऊन घरी परत येतात. २५ ते २७ पक्षी या स्पर्धेत सहभागी झाले. स्पर्धेचा कालावधी दोन महिन्यांचा असतो. त्यात दर आठवड्याला एका गटातील स्पर्धा होते. पक्ष्यांच्या पायात विशिष्ट टॅग असतो. टॅग काढला की त्याद्वारे पक्षाने किती अंतर कापले, कोण जिंकले हे कळते.
२७५ किमीच्या पुणे- जालना या अंतराच्या कबुतर उडणे स्पर्धेत मुस्तफा पटेल यांनी प्रथम पारितोषिक पटकाविले. तर शैलेंद्र जाधव, सुनील अलकुंटे यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे पारितोषिक जिंकले. इतर गटातील विजेत्यांना देखील यावेळी पारितोषिके देण्यात आली.
न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.











































