हवेतील आर्द्रतेचा वापर करून शुद्ध पाण्याची निर्मिती, विदर्भात राज्यातील पहिला प्रकल्प पूर्णत्वास

नागपूर २३ मे २०२३:राज्यातील अनेक भागात, खास करून ग्रामिण भागात तीव्र उन्हाळ्यात पाण्याअभावी अनेक संकटे उभी राहतात. जिथे पिण्याच्या पाण्यासाठी मारामार तिथे शेती साठी पाणी कुठून आणणार अशी परिस्थिती. गावेच्या गावे पाण्यासाठी स्थलांतरित होतात. मुक्या जनावरांचे हाल होतात. शहरात टँकरने तरी पाणीपुरवठा होतो, पण दुर्गम भागात पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. ३०० ते ५०० फूट बोअर घेऊनही पाणी लागत नाही. या पाणीप्रश्नावर उपाय म्हणून नागपुरातील साम्विद इंटरनॅशनल या संस्थेने नटराज निकेतन या संस्थेच्या मदतीने, अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील राणीगाव येथे, हवेतील आर्द्रतेचा वापर करून शुद्ध पाण्याच्या निर्मितीचा राज्यातील पहिला प्रकल्प उभारला आहे.

अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील राणीगाव हे समुद्रसपाटीपासून ३७७८ मीटर सर्वाधिक उंचीवरील गाव. २,१८७ लोकसंख्या असलेल्या या गावातील लोकांना पाण्यासाठी ५ ते १० किलोमीटर पायपीट नेहमीचीच होती. गावात नोव्हेंबरपासूनच पाणीटंचाई सुरू होते. परंतु, आता किमान पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तरी मार्गी लागत आहे. तोही पाइपलाइन किंवा बोअरने नव्हे, तर हवेच्या माध्यमातून. येथील पिण्याच्या पाण्याची गरज आता हवेतील आर्द्रतेच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे.

साम्विद इंटरनॅशनलने पाणीनिर्मितीचे तंत्र विकसित केले आहे. मुकुंद पात्रीकर यांच्यासह निखिल व्यास, मधुरा व्यास आदी तांत्रिक चमूने प्रत्यक्ष गावात जाऊन, संपूर्ण बाजू तपासून प्रकल्पाचा आराखडा तयार करून उभारणी केली आहे. या उपकरणात एअर फिल्टरमधून हवा शोषून घेतली जाते. हवेतील धूलिकण व प्रदूषित घटक फिल्टरद्वारे काढले जातात. नंतर दवबिंदूंचे तापमान कमी केले जाते व हीट एक्स्चेंजरवर पिण्याचे पाणी तयार होते. ते एकत्रित करून एका टाकीत साठवले जाते. या पाणीनिर्मितीसाठी ७.२ किलोवाॅट (सिंगल फेज) वीज लागते. यामध्ये ग्रामपंचायतीचा एक कामगार एका कुटुंबासाठी रोज दहा ते बारा लिटर पाणी वितरणाचे नियोजन करतो.

रणरणत्या उन्हाळ्यात पाण्याचा एक थेंबही मोलाचा ठरतो. त्यासाठी हवेतील बाष्पाचा वापर करून पाण्याची निर्मिती करता आली तर किमान पिण्यासाठी पाण्याची सोय तरी होईल या विचारांतून हे तंत्र विकसित करत पात्रीकर यांनी हे संयंत्र राणीगाव येथे उभारले. “साम्विद आॅक्सिऔरा अॅटमाॅसस्पेरिक वाॅटर जनरेटर’ हे या मशीनचे नाव आहे. ही मशीन ५०० ते १००० लिटर पाणी रोज तयार करू शकेल. मे महिन्याच्या अखेरीस या प्रकल्पाचे लोकार्पण होईल, अशी माहिती साम्विद इंटरनॅशनलचे महाव्यवस्थापक मुकुंद विलास पात्रीकर यांनी दिली.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा