नवी दिल्ली, २४ मे २०२३: पुढील महामारीसाठी जगाने तयार राहावे. ही महामारी कोरोनापेक्षाही अधिक प्राणघातक असू शकते, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस गेब्रेयसस यांनी दिला आहे. वार्षिक आरोग्य संमेलनात ते बोलत होते. जगासमोर आणखी एक महामारीचे संकट येण्याचा धोका आहे.
विषाणूचा आणखी एक प्रकार येण्याचा धोका आहे ज्यामुळे रोग आणि मृत्यूमध्ये वाढ होईल. या महामारीसाठी संपूर्ण जगाने तयार राहावे. तसेच व्यापक उपाययोजनांची तयारी करावी. या पिढीने एक छोटासा विषाणू किती भयानक असू शकतो याचा अनुभव घेतला आहे. आता पुढील महामारी जगाचे दार ठोठावते आहे. या माहामारीला आपण सर्वांनी निर्णायक, सामूहिक आणि न्याय्यपणे उत्तर देण्यासाठी तयार असले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
नऊ मुख्य रोग हे सार्वजनिक आरोग्यासाठी सर्वात मोठा धोका निर्माण करतात, असं जागतिक आरोग्य संघटनेने यापूर्वी स्पष्ट केले आहे. उपचारांच्या अभावामुळे किंव्हा साथीच्या रोगास कारणीभूत ठरवण्याच्या क्षमतेमुळे ते सर्वात धोकादायक मानले गेले. कोरोनामुळे जगभरात सुमारे सात दशलक्ष मृत्यूची नोंद झाली आहे. कोविड-१९ साथीचा रोग यापुढे आरोग्य आणीबाणी नाही, असे नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर