अहमदनगर, २५ मे २०२३ : संसद भवनाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन होत आहे.या उद्घाटन सोहळ्यावरून जोरदार आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. देशभरात विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. त्यावर भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावरून सुजय विखेंनी, संजय राऊत यांना टोला लगावला आहे.
नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याला कुणी जावो अथवा न जावो, परंतु संजय राऊतांना तिथे जाण्याचा अधिकार मुळीच नाही.ज्या आमदारांच्या मतावर संजय राऊत खासदार झाले ते त्यांना सोडून गेले.त्यामुळे संजय राऊत यांनी खासदारकीचा राजीनामा दिला पाहिजे. जे लोकप्रतिनिधी शिवसेनेचे आमदार-खासदार झाले त्यांना मागील काही महिन्यांपासून राऊत शिव्या देत आहे.त्यामुळे त्यांनी संसदेच्या उद्घाटनाला जाऊ नये, असे सुजय विखे पाटील म्हणाले आहेत.
संसद भवनाचा उद्घाटन सोहळा जवळ येऊ लागल्यापासून, संजय राऊत नेहमीच विरोधाची भाषा बोलत आहेत. आता संजय राऊतांवर सुजय विखे पाटील यांनी टीका केली आहे. यावर संजय राऊत काय भूमिका मांडतात हे पहावे लागेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर