आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा पीएम मोदींच्या अध्यक्षतेखालील नीती आयोगाच्या बैठकीवर बहिष्कार

नवी दिल्ली, २७ मे २०२३: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आज नवी दिल्ली येथे नीती आयोगाच्या ८ व्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक होत आहे. या बैठकीत अनेक राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी झाले आहेत. पण ८ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, भगवंत मान, नितीश कुमार, के चंद्रशेखर राव, एम के स्टॉलिन, अशोक गहलोत, आणि पिनाराई विजयन हे या बैठकीत सहभागी झालेले नाहीत.

या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्यासह स्मृती इराणी, धर्मेंद्र प्रधान, पीयूष गोयल, आणि नरेंद्र सिंह तोमर आदी केंद्रीय मंत्री यावेळी उपस्थित राहिले होते. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखू , उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, यांच्यासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री बैठकीला उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नवीन संसद भवन वास्तू देशाला समर्पित करतील. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपशासित राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, खासदार तसेच इतर नेते कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित राहतील. पण जवळपास २१ विरोधी पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार घातला आहे. तर २५ पक्षांनी या कार्यक्रमात सहभागी राहणार असल्याचे सांगितले आहे. १२०० कोटींचा निधी या भव्य वास्तू उभारण्यावर खर्च करण्यात आला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा