रानकुत्रे हे मध्य आशिया, अल्ताई पर्वतापासून पूर्व आशियाचा भाग, दक्षिण मंगोलिया, मलाया प्रदेश व भारतातील जंगले यांत आढळतात. तीन जातींचे रानकुत्रे भारतात आढळतात. हा प्राणी कॅनिड कुळातील असून ह्याचे शास्त्रीय नाव क्युऑन अल्पिनस असे आहे. याला इंग्रजीत Dhole(डोल) म्हणतात. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांत त्यांना चार ते सहा पिल्ले होतात. एकाच ठिकाणी अनेक माद्या पिल्ले देतात.
रानकुत्रा हा खांद्याजवळ साधारणपणे दोन फूट उंच आणि डोके व धड धरून तीन फुटापर्यंत लांब असतो. ह्याचे शेपूट दीड फुटापर्यंत लांब असून खूप केसाळ असते. ह्याचे वजन २० किग्रॅ. भरते. मादी त्या मानाने हलकी असते. रानकुत्रा हा प्राणी माणसाळलेल्या कुत्र्यासारखाच दिसतो. ह्याचे शरीर लांबट आणि लांडग्यासारखे सडपातळ असते. ह्याचे पाय व जबडा मात्र काहीसे आखूड असतात. तथापि लांडगा व गावठी कुत्रा यांना सात सात दाढा असतात, तर ह्याला फक्त सहा सहाच दाढा असतात. स्थानानुसार आणि ऋतुनुसार ह्यांचा विशिष्ट तांबडा रंग कमीजास्ती आढळतो.हिमालयात आढळणारी जात अधिक तांबडी असते; परंतु हिमालयापलीकडची ह्याची जात अधिक फिकट असते. भारताच्या दक्षिण भारतात ह्याचा रंग तपकिरी आढळतो.
रानकुत्रे जंगलात आढळतात. लडाख आणि तिबेट या प्रदेशांत ते मोकळ्या मैदानावर आढळतात, कारण त्या उजाड प्रदेशात जंगले नाहीत, परंतु भारतात इतरत्र ते जंगलातच आढळतात. जंगलात त्यांना सावली, अन्न व पडून राहण्यास निवाऱ्याच्या जागा मिळतात.
रानकुत्रा एकलकोंडा नाही. तो कळप करून राहतो. या कळपात एक किंवा अनेक कुटुंबे एकत्र आढळतात. यामुळे टोळी मोठी बनते व ते सर्व मिळून मोठ्या प्राण्यांचीही शिकार करू शकतात. वासाच्या साहाय्याने ते आपले भक्ष्य शोधतात. भक्ष्य दृष्टीच्या टप्प्यात आले की, ते त्याचा पाठलाग करतात. ते एकदम तुटून पडत नाहीत. आपल्या भक्ष्यापासून ते धीम्या गतीने पाठलाग करतात आणि शेवटी त्याच्यावर हल्ला करतात. एकेका हरिणामागे टोळ्याटोळ्यांनी ते धावतात. तेव्हा ते सतत शिट्टी वाजल्यासारखे भुंकतात. माणूस दिसला तरीही ते असाच आवाज काढतात.
तिबेट आणि लडाखमध्ये ते मेंढ्या व हरिणे यांची शिकार करतात, काश्मीरच्या जंगलात ते मार्खोर, कस्तुरी मृग व गोरल यांची शिकार करतात.हिमालयात त्यांचे भक्ष्य ताहर हा प्राणी असतो. भारतात मात्र त्यांचे अन्न मुख्यतः हरणे आहेत. तथापि मोठाल्या टोळ्या म्हशी किंवा गवे यांच्यावरही हल्ला करतात. रानडुकरे हे त्यांचे भक्ष्य होय.
न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.