मणिपूरमध्ये शांतता राखण्यासाठी लष्कराचे मोठे ऑपरेशन, ४० आधुनिक शस्त्रे जप्त

मणिपूर ४ जून २०२३: हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये शनिवारी एक मोठी मोहीम राबविण्यात आली. सैन्य व आसाम रायफल्सच्या जवानांनी पोलीस आणि सीएपीएफ सह संपूर्ण राज्यातील डोंगराळ आणि खोऱ्यात क्षेत्र वर्चस्व अभियान सुरू केले. संयुक्तपणे राबविण्यात आलेल्या या कारवाईतून लुटलेली किंवा हिसकावून घेतलेली शस्त्रे जप्त करण्यात आले.

मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी हे ऑपरेशन सुरू करण्यात आले. मात्र, हे ऑपरेशन सध्या सुरू राहणार आहे. गेल्या एक महिन्यापासून मणिपूर हिंसाचाराच्या आगीत धगधगत आहे. मानवरहित हवाई वाहने आणि क्वाडकॉप्टरच्या देखरेखीखाली या कारवाईत आतापर्यंत ४० शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. याशिवाय मोर्टार, दारूगोळा आणि इतर युद्धसामुग्री जप्त करण्यात आली आहे.

या कारवाईदरम्यान स्थानिक नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची काळजी घेण्यात आली. त्यासाठी पुरेशा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्याचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी अधिकारी आणि सुरक्षा दलांना कडक सूचना दिल्या होत्या. यानंतर सुरक्षा दलांनी मणिपूरमधील लोकांना शांतता व स्थैर्य राखण्याचे आणि लवकरात लवकर शस्त्रे ठेवण्याचे आवाहन केले आहे.

यासोबतच लुटलेली किंवा हिसकावून घेतलेली शस्त्रे आत्मसमर्पण न करणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही सुरक्षा दलांनी दिला आहे. अमित शहा यांच्या आवाहनावर नुकतीच १४० शस्त्रे आत्मसमर्पण करण्यात आली. मणिपूरमध्ये ३ मे रोजी उसळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत सुमारे १०० लोकांचा मृत्यू झाला आहे. या हिंसाचारात सुमारे ३०० लोक जखमीही झाले आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा