पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायतीवर महिलांचा हंडा मोर्चा, बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेड राजा तालुक्यातील घटना

बुलढाणा, ६ जून २०२३ : बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा या गावात ग्रामपंचायतीच्या नियोजनशून्य कारभारामुळे ग्रामस्थांना भिषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पाच हजार वस्ती असलेल्या मलकापूर पांग्रा या गावात महिला सरपंच असून सुद्धा महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

सध्या कडक उन्हाळा असल्याने पाच किमी अंतरावरून पाणी आणावे लागत आहे, पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीमध्ये मुबलक पाणी असताना सुद्धा ग्रामपंचायतीच्या नियोजन शून्य कारभारामुळे २० ते २५ दिवस पाणी पुरवठा केला जात नसल्याने त्रस्त ग्रामस्थानी हातात हंडे घेऊन ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला. महिलांचा उद्रेक पाहून ग्रामसेवक, सरपंच पळून गेले, शेवटी ग्रामस्थानी ग्रामपंचायतीला टाळे ठोकले .जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत टाळे उघडणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

यंदा दरवर्षी पेक्षा कडक उन्हाळा पाहायला मिळाला. यामुळे जागोजागी पाण्याचे स्त्रोत आटल्याचे दिसून येत आहे. त्यातच मान्सून लांबण्याची चिन्ह असल्यामुळे, पाण्यासाठी माणसाबरोबरच जनावरांचे ही अतोनात हाल होताना दिसत आहेत. परंतु मलकापूर पांगरा येथील ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विहिरीमध्ये मुबलक पाणी साठा उपलब्ध असतानाही लोकांना पाणी पुरवले जात नाही. ही शोकांतिका म्हणावी लागेल

न्यूज अनकट प्रतिनिधी अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा