कर्जत, १२ जून २०२३ : नगर जिल्ह्यातील कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदी भाजपचे उमेदवार निवडून आणून आमदार राम शिंदे यांनी रोहित पवार यांना धोबीपछाड देत कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपचा झेंडा फडकवला आहे.
कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक पार पडली. यात भाजप नेते राम शिंदे यांच्या गटाने विजय मिळवत सभापती व उपसभापती अशी दोन्ही पदे खेचून घेतली. तर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का दिला आहे. कर्जत बाजार समितीच्या १८ जागांसाठी निवडणूक पार पडली होती. त्यावेळी रोहित पवार व राम शिंदे या दोन्ही गटाच्या ९-९ जागा निवडून आल्या होत्या. त्यामुळे रोहित पवार व राम शिंदे या दोन नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.
कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी भाजपचे काकासाहेब तापकीर तर उपसभापती पदी अभय पाटील यांचा विजय झाला आहे. बाजार समितीमध्ये सत्ता स्थापनेत कोणाची सरशी होणार याकडे अनेकाच्या नजरा लागल्या होत्या. मात्र आमदार शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांना शह देत राष्ट्रवादीची मते फोडली आणि सभापती व उपसभापतीपदी भाजपचे उमेदवार निवडून आणले.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर