मुंबई १३ जून २०२३: मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावरील खंडाळा घाटाजवळ आज १३ जून, मंगळवार रोजी झालेल्या अपघातात, एका रासायनिक तेलाच्या टँकरला आग लागली. या आगीत ४ जणांचा मृत्यू झाला असून ३ जण जखमी झाले. त्यामुळे अनेक तासापासून वाहतूक ठप्प झाली. ऑईल मुळे आग अधिकच भडकली असून पुलाखालील वाहनांनाही आग लागल्याची माहिती समोर येत आहे.
या भीषण आगीच्या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले आहे. चार मृतांना श्रद्धांजली वाहताना त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, तीन जखमींवर उपचार सुरू असून राज्य पोलिस, महामार्ग पोलिस, आयएनएस शिवाजी आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी उपस्थित आहेत. आग आटोक्यात आणण्यात आली असून एकेरी वाहतूक सुरू झाली आहे आणि लवकरच दुसऱ्या बाजूची वाहतूक सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
घटनेची माहिती काही लोकांनी दिली. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर रासायनिक तेलाचा टँकर भरधाव वेगाने जात होता, दरम्यान चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे टँकर घसरला आणि टँकरने पेट घेतला. त्यातील केमिकल पुलाखाली वाहत गेले. केमिकल असल्याने आग झपाट्याने भडकली. या आगीत अनेक जण जखमी झाल्याची पण माहिती समोर येत असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी- सूरज गायकवाड