कोल्हापूर १३ जून २०२३: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज कोल्हापूर दौऱ्यावर येणार होते. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्या तब्येतीच्या कारणास्तव त्यांचा कोल्हापूर दौरा रद्द झाला आहे. अशी माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री दिपक केसरकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली.
आज सायंकाळी तपोवन मैदान येथे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होणार आहे. पुढे बोलताना केसरकर म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सायनसचा त्रास होत असून, त्यांना पुढचे दोन दिवस विमान प्रवास न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. आरोग्याच्या कारणास्तव फडणवीस यांना विमान प्रवास करणे शक्य नाही. त्यामुळे त्यांचा कोल्हापूर दौरा रद्द झाला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत फडणवीस यांच्या ऐवजी चंद्रकांत पाटील हे कोल्हापूर दौऱ्यावर असणार आहेत. जाहिरतीत काही चूकले असले तर ते सुधारु असे शिक्षणमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री दिपक केसरकर यांनी स्पष्ट केले.
न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर