बेडूक कितीही फुगला तरी हत्ती बनत नाही, मुख्यमंत्री शिंदे यांच्या सर्व्हेच्या जाहिरातीवर भाजप खासदार अनिल बोंडे यांची जळजळीत टीका

वाशिम १४ जून २०२३ : काल शिंदे गटाने राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे अशी जाहिरात वर्तमानपत्रांमध्ये दिली होती. या जाहिरातीतील मजकूर भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला. यावर प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच निशाणा साधला. बेडूक कितीही फुगला तरी हत्ती बनत नाही, अशा शब्दात अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सर्व्हेच्या जाहिरातीवर जळजळीत प्रतिक्रिया व्यक्त केली. बोंडे यांनी एक प्रकारे शिंदे यांची, बेडकाशी तुलना केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शिंदे चांगले मुख्यमंत्री आहेत, परंतु त्यांना त्यांच्या आजूबाजूचे लोक चुकीचे सल्ले देतात असे सांगतानाच शिंदे यांना ठाणे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र वाटायला लागला आहे, असा उपरोधिक हल्लाही अनिल बोंडे यांनी केला.

वर्तमानपत्रातील जाहिराती मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तुलना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केली. तसेच एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्रातील लोकप्रिय नेते आहेत, बाकी कोणी नाही असेही या जाहिरातीतून अप्रत्यक्षपणे सूचवून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व एकप्रकारे नाकारण्यात आले. त्यामुळे भाजप खासदार अनिल बोंडे यांनी थेट आणि उघडपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटात मोठी ठिणगी पडल्याचे दिसून येतय.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व समाजासाठी काम करतात. ते भाजपमधील मोठे नेते आहेत. त्यांचे नाव खेड्यापाड्यासह इतर ठिकाणी घेतले जाते. त्यामुळे हा सर्व्हे नेमका कोणी केला? तो ठाण्यापुरत मर्यादित होता का? की महाराष्ट्राचा होता? असा सवाल करतानाच पुढच्या काळात शिवसेनेला वाटचाल करायची असेल तर भाजप आणि जनतेच मन दुखवून, स्वतःला पुढे करून चालणार नाही. आजुबाजुला टिमकी वाजवून सल्ले देणारे असतील तर त्यांचे कल्याण होणार नाही, असा टोलाही बोंडे यांनी यावेळी लगावला.

न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा