जळगाव १६ जून २०२३ : वंचित बहुजन आघाडीची उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेने बरोबर युती आहे. प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत घेण्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्नशील आहेत, पण या प्रयत्नांना यश मिळणे कठीण दिसत आहे. आजवर वंचित बहुजन आघाडीवर बोलणे टाळणारे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वंचितवर पहिल्यांदाच सडकून टीका केली आहे. शरद पवार यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी ही बी टीम असल्याचे म्हटले, त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीचे दरवाजे बंद झाल्याचे दिसतय.
शरद पवार हे आज जळगाव जिल्ह्यात आहेत. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांनी वंचित वर टीका केली. विशेष म्हणजे आजवर शरद पवार वंचित आघाडीवर बोलणे टाळत होते, परंतु एका प्रश्नावर उत्तर देताना पवार यांनी थेट वंचित आघाडीचे रूपच उघडे केले. मागच्या निवडणुकीत आम्हाला नुकसान सहन करावे लागले, ते नुकसान आम्हाला वंचित बहुजन आघाडीमुळे झाले असे शरद पवार म्हणाले. त्यांनी कुठे काम करावे हा लोकशाहीत त्यांचा अधिकार आहे, त्याबद्दल मला काही आक्षेप घ्यायचा नाही. पण महाराष्ट्रावर याचा काय परिणाम होईल हे माहीत नाही. काही वेळेला राजकारणात स्वत: लढायचे असते आणि दुसऱ्यांच्या पायात पाय घालण्यासाठी एक दोन टीम तयार करायच्या असतात. त्या टीमला साधारणत: राजकारणातील बी टीम म्हणतात. आता ही बी टीम आहे की नाही ते कळेल, असा टोला शरद पवारांनी लगावला.
यावेळी पवार यांनी भाजप कोणकोणत्या राज्यात नाही याची यादीच सांगितली. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगना, ओडिशा, राजस्थान, दिल्ली, पंजाब, झारखंड, उत्तराखंड, हिमाचल आणि पश्चिम बंगालमध्ये भाजप नाही. यूपीत, मध्यप्रदेशात आहे. मध्यप्रदेश आणि गोव्यात भाजपने काँग्रेसचे आमदार फोडून सत्ता आणली, यामध्ये खोक्याचा कार्यक्रम झाला. महाराष्ट्रातही खोक्यांचा कार्यक्रम झाला, असेही पवार यांनी सांगितले. भाजपला बहुसंख्य राज्यात लोकांनी बाजूला ठेवले असुन लोक देशपातळीवरही वेगळा विचार करतील असे वाटते. त्यामुळे सर्वांनी एकत्र बसून विचार केला पाहिजे. लोकांच्या इच्छांची पूर्तता केली पाहिजे. मोठी आश्वासने द्यायची आणि काहीच करायचे नाही, शेतीमालाला दुप्पट भाव करणार सांगायचे आणि काहीच करायचे नाही. बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे. नोकऱ्या दिल्याचे सांगतात, पण प्रत्यक्षात काही नाही. या सर्व गोष्टी बदलायच्या असतील तर परिवर्तन हाच त्यावर पर्याय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
निवडणुकांविषयी विचारलेल्या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, निवडणुका लवकर होतील की नाही हे सांगता येत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदीच याबाबत ठरवतील. सध्याचे राज्यांचे निकाल पाहिल्यानंतर कोणताही शहाणा माणूस निवडणुका घेईल असे वाटत नाही, असेही पवार म्हणाले.
न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर