हिंगोली १७ जून २०२३: कळमनुरी तालुक्यातील वारंगाफाटा शिवारात आज सकाळी ११ वाजता, एका वाहनातून ८ गाई कत्तलखान्याकडे नेल्या जात होत्या. बाळापूर पोलिसांनी हे वाहन पकडून या गायींची सुटका केली. या प्रकरणी चालकाला ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली.
कळमनुरी तालुक्यातील कामठा फाटा येथील आठवडी बाजारातून, काही गायी कत्तलखान्यात नेल्या जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले यांच्या पथकाने आज सकाळपासूनच वारंगाफाटा शिवारात वाहनांची तपासणी सुरू केली होती.
आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास एका वाहनाची तपासणी केली असता त्यात ८ गाई कोंबून बसविण्यात आल्याचे दिसून आले. पोलिसांनी चालकाकडे विचारणा केली असता त्यांने सदर गायी कामठा फाटा येथून घेतल्या व त्या अर्धापूर येथे नेल्या जात असल्याचे सांगितले. पोलिसांनी चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर