मुंबई १८ जून २०२३: प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांचे वाद सुरू असताना युवक काँग्रेसमधील वादही काल चव्हाट्यावर आला. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या बैठकीत, अध्यक्ष कुणाल राऊत आणि प्रभारी कृष्णा अलवरु यांना हटविण्याच्या मागणीवरून या बैठकीत खुर्च्या फेकण्यात आल्या व जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. युवक काँग्रेसमधील राडा राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास यांच्यासमोर घडला. त्यामुळे आपली नियोजित पत्रकार परिषद रद्द करीत ते थेट दिल्लीला रवाना झाले.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक, मुंबईतील प्रदेश काँग्रेसच्या टिळक भवन दादर येथील मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवासन यांच्या उपस्थितीत बैठक होणार असल्याने कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. या बैठकीत माजी मंत्री नितीन राऊत यांचे चिरंजीव तसेच महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष कृणाल राऊत यांच्या कार्यप्रणाली बाबत, चार उपाध्यक्षांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपले मार्गदर्शन संपवून निघाल्यानंतर हा सर्व प्रकार घडला. युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवासन हे पत्रकार परिषद घेणार होते. राडा झाल्याने कार्यक्रम संपताच पत्रकार परिषद टाळून श्रीनिवासन निघून गेले. घडलेल्या प्रकाराचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर