आसामच्या नलबारी जिल्ह्यात पुरामुळे हाहाकार, १०८ गावे पाण्याखाली तर ४५,००० हजार लोक बाधित

नलबारी, आसाम २२ जून २०२३: आसामच्या नलबारी जिल्ह्यात पुरामुळे परिस्थिती खूपच बिघडली आहे. नलबारीसोबतच आसामच्या खालच्या भागात, जिल्ह्यातील ६ महसूल मंडळांर्गत सुमारे १०८ गावे सध्या पाण्याखाली गेलीयत, तर ४५,००० हजार लोक बाधित झाले आहेत. गेल्या काही दिवसांत आसाम आणि शेजारील देश भूतानमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने पगलडिया नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली, त्यामुळे या संपूर्ण भागात पूर परिस्थिती निर्माण झालीय.

मिळालेल्या माहितीनुसार, मोईरंगा, बटाहाधिला गावातील सुमारे २०० कुटुंबे या महापुरामुळे बाधित झाली असून बहुतांश कुटुंबे आता तात्पुरती तंबू बनवून, रस्त्यावर आणि बंधाऱ्यांवर आसरा घेत आहेत. पुराच्या पाण्याने जिल्ह्यातील घोगरापूर, तिहू, बारभाग आणि धमधामा भागातील जवळपास ९० गावे बुडाली असून पुराचे पाणी घरात शिरल्याने अनेक गावकऱ्यांना घरे सोडून रस्त्यावर, उंच जमिनीवर आश्रय घ्यावा लागला आहे.

पुराचे पाणी सर्वत्र घुसले असून पुराच्या पाण्यामुळे जिल्ह्यातील जवळपास ३१० हेक्टर पीक जमीन पाण्याखाली गेली आहे. गेल्या २४ तासांत पुराच्या पाण्याने जिल्ह्यातील दोन बंधारे, १५ रस्ते, दोन पूल, आणि कृषी बंधाऱ्यांचे नुकसान झाले. पूरग्रस्त जिल्ह्यात १.०७ लाखांहून अधिक पाळीव प्राणी आणि कुक्कुटपालन व्यवसाय असुन त्यांनाही पुराचा फटका बसलाय.

न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा