मुंबई २२ जून २०२३: विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महसूल विभाग, कृषी विभाग, वन विभागात झालेल्या बदल्यांवरून सरकारवर गंभीर आरोप केले होते. त्यांनी महसूल विभागातील ६६ अधिकाऱ्यांच्या झालेल्या बदल्यांमध्ये मोठया प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे म्हंटल्याने, राज्यात एकच खळबळ उडाली होती.
आता या संदर्भात मॅटकडून सरकार आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना दणका देण्यात आलाय. महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या झालेल्या बदल्यांनाच आता स्थगिती दिली गेली, तर कायदेशीर प्रक्रियेचे उल्लंघन करत या बदल्या करण्यात आल्याचे निरीक्षण, यावेळी मॅटकडून सरकारविरोधात नोंदवण्यात आले. त्यामुळे हा शिंदे-फडणवीस सरकार आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना धक्का मानला जात आहे.
शिंदे-फडणवीस सरकारने काही दिवसापूर्वी, महसूल विभागाबरोबरच पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलीस निरीक्षकांच्या १०९ बदल्या केल्या आहेत. आता महसूल विभागाच्या बदल्यांवर मॅट कडून बोट ठेवले गेले असल्याने, पोलीस खात्यात करण्यात आलेल्या बदल्यांबाबत कोणी आक्षेप घेतला तर या सरकारला परत याच नामुष्कीला सामोरे जावे लागणार का? हे पहावे लागेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर