आम्ही नवाज शरीफ यांचा केक कापायला गेलो नव्हतो, देवेंद्र फडणवीसांच्या टीकेवर संजय राऊत यांचे प्रत्युत्तर

मुंबई २४ जून २०२३: भाजपवर मेहबूबा मुफ्तींवरून टोमणे मारणारे उद्धव ठाकरे हे आज मेहबूबा मुफ्ती यांच्या बाजूला जाऊन बसले, अशी सडकून टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केली होती. फडणवीस यांच्या या टीकेला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. मेहबूबा मुफ्ती या विरोधकांच्या बैठकीला आल्या होत्या, आणि ही बैठक पाटण्यात होती जम्मू-काश्मीरमध्ये नाही. आम्ही जम्मू-काश्मीरमध्ये गेलो नव्हतो, असे सांगतानाच आमच्यावर बोलताना जपून बोला. आम्ही काही नवाज शरीफ यांचा केक कापण्यासाठी गेलो नव्हतो, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना फडणवीसांवर केला.

फडणवीसांना टोमणे मारताना राऊत पुढे म्हणाले की, त्या मुफ्ती यांच्या बरोबर तुम्ही सरकार बनवले, त्यांच्या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले होते. आणि आम्ही काय नवाब शरीफ यांचा केक कापला नाही? किंवा मुफ्तीच्या सरकारमध्ये गेलो नाही, ते तुमचेच पाप आहे. तोंडाच्या वाफा दडवू नका, टीका करताना जरा जपून करा. भविष्यात या विषयावर आम्ही बोलूच, उद्धव ठाकरे त्यांना उत्तर देतीलच. मुफ्ती यांच्या मुद्द्यावरून आमच्याकडे बोट दाखवू नका. पीओके भारताला जोडण्याचं आश्वासन तुम्ही दिलेल, ते कुठपर्यंत आलंय ते पाहा आधी,असा चिमटाही राऊत यांनी फडणवीसांना काढला.

कालच्या पाटण्यातील विरोधी पक्षाच्या बैठकीचे फलित एवढेच आहे की, आम्ही देशभक्त विरोधक एकत्र आलो आहोत. २०२४ मध्ये आम्ही देशात परिवर्तन घडवू. २०२४ मध्ये सत्ता परिवर्तन नाही केले तर ही निवडणूक शेवटची असेल. त्यामुळे लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आपल्याला एकत्र राहावे लागेल, असे उद्धव ठाकरे म्हणल्याचे संजय राऊतांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा