महात्माजी आता लग्न करा, दाढी वाढवून कुठे फिरताय? लालू यादव यांचा राहुल गांधींना मिश्कील चिमटा

पाटणा, बिहार २४ जून २०२३: आमचे ऐका, निदान लग्न तरी करा. तुमची आई सांगायची, तो माझे ऐकत नाही, तुम्ही सगळे मिळून त्याचे लग्न लावून द्या. तेंव्हा अजून वेळ गेलेली नाही. लग्न करा, आम्ही वरातीत येऊ. तुम्ही दाढी वाढवली आहे, आता ती कापून घ्या. हे नितीशजींचे मत आहे, दाढी लहान करा, अशा अनेक मिश्किल चिमट्यांनी राहुल गांधींना हैराण करत, बाकीच्यांना हसवत, भाजपला टोले लगावत लालूप्रसाद यादवांनी पत्रकार परिषदेत तुफान बॅटिंग केली.

पाटण्यातील विरोधी एकजुटीच्या बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत लालू आपल्या जुन्या शैलीत दिसले. या पत्रकार परिषदेत लालू म्हणाले की, राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशभर दौरा केला, त्यांनी खूपच चांगले काम केले. अदानींच्या बाबतीतही त्यांनी लोकसभेत आवाज उठवला. पण राहुल महात्माजी तुम्ही आता लग्न करा, दाढी वाढवून कुठे फिरताय? हे ऐकून मुख्यमंत्री नितीश कुमार आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह सर्व विरोधी पक्षांचे नेते हसू लागले.

लालुंनी यावेळी भाजप आणि पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. लालू म्हणाले की, नरेंद्र मोदी जगभर चंदन वाटत फिरतायत. चुकीच्या पद्धतीने सरकार चालवल्याने पुढील काळात भाजप आणि मोदींचे फार वाईट होईल, २००० च्या नोटेवर बंदी का आणली हे माहित नाही, त्यांच्याच लोकांनी नोटा ठेवल्या होत्या. आता त्या बाहेर काढत आहेत.

पुढे ते म्हणाले की, आम्ही तर भेंडी विकत घ्यायलाही जात नाही कारण ती ही ६० रुपये किलो झालीय. किराणा सामानाचे वाढलेले दर तुम्हा सर्वांना माहिती असतीलच. कर्नाटकात हनुमानजींनी भाजपच्या पाठीवर अशी गदा मारली की राहुल यांचा काँग्रेस पक्ष जिंकला. आता हनुमानजी आमच्या सोबत आहेत, आणि आम्ही देशातील सर्व विरोधक म्हणजेच नल-नील यांची सेना गोळा करत आहोत. २०२४ ला हे लोक निश्चित पणे पायउतार होतील.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा