सोलापूर, १ जुलै २०२३: जॉब, धंदा, लघुउद्योग, मोठ्या इंडस्ट्री, प्रगती, राहणीमान, शिक्षण, आरोग्य, आनंदी वातावरण या सगळ्या गोष्टी कोणालाही आपल्या आजुबाजुलाच म्हणजेच आपल्या जन्मगावी जर मिळाल्या, तर या गोष्टींसाठी दुसऱ्या शहरात जाण्याची गरजच कोणाला पडणार नाही. याच गोष्टींचा विचार करून ‘आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीजने’ महाराष्ट्रातला स्थानिक रोजगार आणि स्थानिक टॅलेंट या बाबतीत भरीव काम करण्याचा निर्णय घेतलाय. या कार्याची मुहुर्तमेढ येत्या २ ऑगस्ट रोजी, सोलापुरातील पहिल्या ‘आयटी पार्क’ भूमीपूजनाच्या निमित्ताने रोवली जाईल.
आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज् चे सीईओ व सीएफओ श्री.मनोहर जगताप यांच्या दुरदृष्टीतून, सोलापूरकरांचे स्वतःच्या आयटी पार्क चे स्वप्न आता सत्यात उतरणार आहे. नुसते आयटी पार्कच नाही तर ‘ह्युमोनाईड रोबोट’ या आर्यन्स ग्रुपच्या महत्वकांक्षी प्रोजेक्ट चे मॅन्युफॅक्चरिंग युनिट तसेच आर्यन्स च्या इतर प्रोजेक्ट्स ची कार्यालयेही सोलापूर शहर आणि ग्रामिण भागात होणार आहेत. यातून सोलापुरातील टॅलेंट आणि स्थानिक रोजगाराला चालना मिळून, येथील तरुणाई जॉब किंवा व्यवसायासाठी दुसऱ्या शहरात ‘स्थलांतर’ करणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या सहाय्याने तसेच सोलापुरातील स्थानिक उद्योगपती व राजकारणी श्री महेश कोठे यांचेही आयटी पार्कचे अनेक वर्षाचे स्वप्न, त्यांच्याच सहकार्याने आर्यन्स ग्रुप पुर्ण करत आहे.
सोलापूर शहर व जिल्ह्यात मिळून १५ च्या आसपास अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. त्यातून दरवर्षी अंदाजे चार ते साडेचार हजार विद्यार्थी पदवी घेऊन बाहेर पडतात. केवळ अभियांत्रिक नाही तर अन्य तांत्रिक शिक्षण घेतलेल्यांची संख्याही मोठी आहे. गेल्या वीस पंचवीस वर्षांपासून सोलापुरातील युवक शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या निमित्ताने पुणे, हैदराबाद, मुंबई, चैनई, बंगलोर येथे स्तलांथर होत आहेत. सोलापूरच्या तरुणाईच्या कल्पकतेला तोड नाही. परंतु शासन, राजकारणी व तत्सम यंत्रणांचे मात्र सोलापूरकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झालेले दिसते. याचा परिणाम म्हणून जिल्ह्यातील गावेच्या गावे ओस पडतायत, शहरातही अशीच परिस्थिती आहे, याच कारण एकच, ते म्हणजे रोजगारासाठीच स्थलांतर. अगदी काही दिवसांनी सोलापूर हे पेन्शनरचे गाव होणार अशी परिस्थिती असताना, आता आर्यन्स ग्रुप च्या निमित्ताने एक आशेचा किरण सोलापूरकरांना दिसतोय.
आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. ज्यामध्ये मीडिया अँड इंटरटेनमेंट, पब्लिकेशन्स, एज्युकेशन, इन्फ्रास्ट्रक्चर अँड रिअल इस्टेट, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, हॉस्पिटॅलिटी, हेल्थकेअर, फायनान्स, ग्रीन एनर्जी, बिजनेस एनसीलरी सर्विस, फार्मासिटिकल्स, एव्हिएशन, पेट्रोकेमिकल्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, गोल्ड रिफायनरी, इलेक्ट्रिक वेहिकल्स, एग्रीकल्चर अँड ऑरगॅनिक फार्मिंग या क्षेत्रांचा समावेश आहे.
आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज् ही भारतात व प्रामुख्याने महाराष्ट्रातील विविध भागात सेमी कंडक्टर, OLED प्लांट, फिंगरप्रिंट सेन्सर, सिलिकॉन, डिस्प्ले मधील महत्त्वपूर्ण घटक टीएफटी प्लांटही उभारत आहे, तसेच आयटी क्षेत्रात काही महत्त्वाच्या प्रकल्पांवर देखील काम करत आहे. कंपनी पूर्णतः भारतीय बनावटीचे सर्च इंजिन बनवणार आहे. कंपनीसाठी हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. कारण गुगल किंवा इतर सर्च इंजिन देशाबाहेरील आहेत. ज्यामुळे भारताच्या दृष्टीने हा एक सुरक्षेचा विषय आहे. अत्याधुनिक आयटी पार्क च्या माध्यमातून सोलापूर सारख्या भागात आर्थिक विकासाला चालना मिळणार आहेच, त्याबरोबरच येथे रोजगाराच्या अनेक संधी देखील निर्माण होतायत.
येत्या २ ऑगस्ट रोजी सोलापुरातील डोणगाव रोडवरील श्री महेश कोठे यांच्या ७५ एकर जागेमध्ये, श्री शरद पवार साहेब यांच्या हस्ते या ‘आयटी पार्कचे’ भूमिपूजन केले जाणार असल्याची माहिती श्री मनोहर जगताप व श्री महेश कोठे यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषदेत दिली. येत्या सात ते आठ महिन्यात प्रत्यक्ष कंपनी सुरू होईल व सुरवातीला स्थानिक १००० ते १२०० तरुण तसेच इतर लोकांना यात जॉब च्या संधी असतील. नंतर टप्प्याटप्प्याने ही संख्या अजून वाढतच राहील, असे सांगताना श्री मनोहर जगताप म्हणाले की, आम्ही हे ठिकाण निवडले कारण सोलापूरला जोडणारे सर्वच मुख्य रस्ते चौपदरी झाले आहेत. रेल्वेचे दुहेरीकरण व इलेक्ट्रीफिकेशनच्या कामाने गती घेतली आहे. काही दिवसांत विमान सेवाही सुरू होतेय, दळणवळणाबाबत सोलापूर हे ‘बेस्ट डेस्टीनेशन’ आहे. आणि याही पुढे इथलं स्थानिक टॅलेंट आहे, त्यामुळे आता लवकरच सोलापूरचे भूमिपुत्र ‘उलट स्थलांतर’ करून सोलापूरला परत येतील अशी आशा आहे.
या पत्रकार परिषदेस ‘आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज’ चे सीईओ व सीएफओ श्री मनोहर जगताप, संचालक श्री संजय शेंडगे, श्री किरण लोहार तसेच श्री महेश कोठे, डॉ सूर्यप्रकाश कोठे, श्री प्रथमेश कोठे, श्री विनायक कोंड्याल, श्री शशिकांत कैंची त्याबरोबरच पत्रकार बांधव व इतर मान्यवर उपस्थित होते.
न्युज अनकट प्रतिनिधी : गुरुराज पोरे.