पुढील ५ दिवस महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस, २ जुलैपासून तीव्रता वाढेल

मुंबई, १ जुलै २०२३: पुढील ५ दिवस महाराष्ट्रात विविध ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल, असे कळवताना हवामान खात्याने (आयएमडी) २ जुलैपासून पावसाचा नवा टप्पा सुरू होईल आणि पावसाचा जोर आणखी वाढेल, असा अंदाज व्यक्त केलाय. मुंबईत पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असुन मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पाणी साचल्याने १० ते १५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पुण्यातील रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक मंदावली आहे. तसेच नाशिकमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे बराच कांदा वाहून गेला.

रायगडमधील बिरवाडी येथे दरड कोसळल्याने तीन गावांचा संपर्क तुटला आहे. रत्नागिरीतील खेडमध्ये जगबुडी नदीचे पाणी धोक्याच्या चिन्हावरुन वाहत असुन संगमेश्वरमध्ये २९ गावांमध्ये दरड कोसळण्याची शक्यता व्यक्त करत सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. भंडारा येथील गोसीखुर्द धरणात पाणीसाठा वाढल्याने धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले.

जुलैमध्ये पुढील ती दिवस जास्तीत जास्त पाऊस पडेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मान्सून पूर्ण ताकदीने सक्रिय झाला असला तरी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे. त्यामुळेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांनी १०० मिमी पाऊस पडेपर्यंत पेरणी सुरू करू नये, असे आवाहन केले आहे. अशा परिस्थितीत भारतीय हवामान विभागाच्या पुणे शाखेचे प्रमुख के.एस.होसाळीकर यांनी एक ट्विट केलय, या ट्विटमध्ये त्यांनी पुढील पाच दिवस संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून, विविध भागात येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा