कामशेत(पुणे), १ जुलै २०२३: कामशेत परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सकाळी वडिवळे पूल वाहून गेला, त्यामुळे सात गावांचा कामशेत शहराशी असलेला संपर्क तुटला आहे. सध्या परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे हा पूल वाहून गेला, त्यामुळे सांगिसे, वळख, वडिवळे, बुधवडी, नेसावे, खांडशी, वेल्लोळी गावांचा संपर्क तुटला आहे.
या ठिकाणी दोन महिन्यांपासून नवीन पुलाचे काम सुरू असुन ते काम अपूर्ण असल्यामुळे जुन्या पुलावर बांध घातला होता. पावसाचा जोर वाढल्याने पाण्याचा दबाव वाढल्यामुळे बांध फुटला व पूल वाहून गेला. आता पुल नसल्यामुळे सात गावांतील नागरिकांचा कामशेत शहराशी जनसंपर्क तुटला असुन ये-जा करण्यासाठी नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
पर्यायी जवळचा रस्ता नसल्याने नागरिकांची मोठी अडचण झालीय. यामध्ये दूध विक्रेते, कामगार, शिक्षक, विदयार्थी व शेतकरी यांचा कामशेत शहराशी संपर्क तुटला आहे. विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करणे अवघड झाले आहे. परिसरातील नागरिकांनी पर्यायी रस्त्यांची मागणी केली आहे. मुंढावरे मार्गे जाणारा रस्ता अतिशय खराब असल्याने पावसाळ्यात या रस्त्यातून प्रवास करणे अवघड झालय.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर