पुणे, १ जून २०२३ : महाराष्ट्रभर गवगवा झालेल्या समुद्धी महामार्गावर अनेक अपघात झाले आहेत. आजवर या महामार्गावर ९०० लोकांनी आपला जीव गमावला आहे. समृद्धी महामागार्वर सकाळी झालेला अपघात ही दुःखद घटना आहे. या महामार्गावर अनेक अपघात झालेत. सातत्याने अपघात होतात. हे गेले काही महिने बघायला मिळत आहे.समुद्धी महामार्गाचे काम शास्त्रीय पद्धतीने झालेले नसावे. ज्यांनी रस्त्याचे नियोजन केले, तो तयार केला त्यांना ते लोक दोषी ठरवतात. जे झाले ते वाईट झाले. ५ लाख मदत देऊन प्रश्न सुटत नाहीत. पण, असे अपघात पुन्हा होऊ नये यासाठी तज्ज्ञ, कर्तबगार लोकांची समिती तयार करावी अशी मागणी शरद पवार यांनी केली. ते पुण्यामध्ये औपचारिक माध्यमांशी बोलत होते.
तज्ज्ञ लोकांच्या समितीने रस्त्याची कमतरता शोधून काढावी. रस्त्याची पाहणी करायला हवी. त्यासाठी विशेष पथक नेमायला हवे. अपघातग्रस्त भाग अशा खुणा रस्त्यावर बघायला मिळत नाहीत. सलग रस्ता असल्यामुळे वाहन चालवताना काही गोष्टी लक्षात येत नाही असे काही लोकांचे म्हणणे आहे. त्यामुळे नीट अभ्यास होणे गरजेचे आहे. लोकांचे प्राण हे वाचवायला हवेत असे पवार यांनी सांगितले.
सरकारच्या वर्षपूर्तीच्या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, राज्यात कायदा सुव्यवस्था आहे का? असा सवाल करून ते म्हणाले, महिलांवर हल्ले होत आहेत. पुण्यात मुलीच्या हत्येचा प्रयत्न होतो. कोयता गँग ही या राज्य सरकारची देणगी आहे. कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची क्षमता सरकारमध्ये नाही. महाराष्ट्रात गुंतवणूकदार येत आहेत अशा बातम्या येतात. पण, महाराष्ट्रातील प्रकल्प बाहेर जात आहेत. राज्य कसे चालले आहे यांचे उत्तम उदाहरण पहायला मिळत आहे. घाईघाईत प्रकल्प मंजूर करण्याचे निर्णय घेतले जातात. मी मुख्यमंत्री असताना दोन ते तीन तास बाहेरील गुंतवणूकीवर चर्चेसाठी वेळ द्यायचो असे पवार यांनी सांगितले.
फडणवीस यांच्यावर बोलताना पवार म्हणाले, माझी गुगली फडणवीस यांना कळलीच नाही. माझ्या गुगलीवर ते आऊट झाले. त्यांना गुगली टाकलेली कसे कळणार? ते बॉलरला माहित असते. मी जे सांगितले ते अर्धसत्य होते असे त्यांचे म्हणण असेल. आमची भूमिका दोन दिवस आधी कळल्यानंतर तुम्ही शपथविधीचा उद्योग दोन दिवसांनी का केला? असा सवालही पवार यांनी केला.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर