बुलढाणा, २ जुलै २०२३ : काल रात्री नागपुरहून पुण्याला येणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या खाजगी बसला बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा येथे अपघात झाला होता. यामध्ये होरपळून २५ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे मृतदेह बाहेर काढून जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सिंदखेडाराजा नजीक समृद्धी महामार्गावर झालेल्या या अपघातात २५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. भीषण आगीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे चेहरे ओळखता येत नव्हते. त्यानंतर त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू होते. मात्र अपघातात मृत्यू झालेल्या त्या २५ जणांची नावे उघड झाली असून त्यांची ओळख पटवण्यात अडचणी येत असल्याने प्रशासन आणि नातेवाईकांच्या सहमतीने सामूहिक अंत्यसंस्काराचा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी माहिती दिली आहे. तसेच त्यांनी यावेळी ‘डीएनए’ चाचणीचे काम सुरू असून ते जिकिरीचे असल्यानेच नातेवाईकांच्या सहमतीने हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले आहे. तर या सर्व मृतांवर बुलढाणा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर