पुणे, १६ जुलै २०२३ : पुणे रेल्वे स्थानकातुन देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वे धावतात. येथून प्रवाशांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. आता लवकरच पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर हा प्रवास जलद आणि वेगाने होणार आहे. या मार्गावर असणाऱ्या मिरज रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरण दुहेरीकरणाचे काम वेगाने सुरु आहे. हे काम पूर्ण झाल्यावर या मार्गावरील प्रवास अधिक वेगाने होणार आहे. मिरज, पुणे रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण झाल्यावर सहा तासांचा प्रवास चार तासांवर येणार आहे. परंतु त्यासाठी अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
पुणे मिरज विभागातील २७९.५ किलोमीटर पैकी आतापर्यंत १६४.०७ किलोमीटर दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. नांद्रे ते सांगली स्थानकात दरम्यानचे १२.६२ किलोमीटर विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येत आहे. उर्वरित काम मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे एप्रिल २०२४ पासून हा प्रवास अधिक वेगवान होणार आहे.
पुणे ते मिरज हे अंतर २८० किलोमीटर आहे. या मार्गावरील दुहेरीकरणाच्या कामास सहा वर्षांपूर्वी सुरुवात झाली होती. परंतु सातारा जिल्ह्यात अनेक अवघड वाटा आहेत. हा भाग डोंगराळ आहे. यामुळे बोगदे आणि पुलांची उभारणी करावी लागत आहे. त्या कामांना विलंब होत आहे. रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या मार्गावर सांगलीतील कामाला चांगलाच वेग आला आहे.
सांगली स्थानकात नवीन स्थानक इमारत बांधली गेली आहे. त्यानंतर या मार्गावर असलेल्या माधवनगर स्थानकावर नवी इमारत तयार केली गेली आहे. माधवनगरला प्लॅटफॉर्म देखील बांधले गेले आहे. नांद्रे रेल्वेस्थानकावर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणा बसवली गेली आहे. पावसाळ्यात येणाऱ्या अडचणींचा सामना करत कामे वेगाने सुरु आहेत. पुणे मिरज मार्ग सुरु झाल्यावर या भागातील अनेक प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. यामुळे एप्रिल २०२४ पासून या मार्गावर गतीमान प्रवास होणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर