मुंबई, १७ जुलै २०२३: मुंबईच्या काही भागात सोमवारी सकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली, याचा सार्वजनिक वाहतूक सेवेवर कोणताही परिणाम झाला नाही. पावसाबाबत रविवारी, भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) मुंबई केंद्राने, सोमवारी शहरात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज देत ‘यलो अलर्ट’ जारी केला.
अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे महालक्ष्मी, भायखळा, मलबार हिल्स, माटुंगा, सायन, वांद्रे, सांताक्रूझ, अंधेरी आणि इतर काही भागात मुसळधार पाऊस सुरू झाला. सकाळी आठनंतर पावसाचा जोर कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, शहरात कुठेही मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचे वृत्त नाही आणि मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर लोकल गाड्या सामान्यपणे धावत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पावसामुळे बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन ( बेस्ट) बससेवेच्या मार्गात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. IMD च्या मुंबई केंद्राने सोमवारी सकाळी ८ वाजता जारी केलेल्या अंदाजात, शहर आणि उपनगरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. सोमवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांच्या कालावधीत मुंबई पूर्व आणि पश्चिम उपनगरात अनुक्रमे ६५.५० मिमी, १९.७४ मिमी आणि २३.५६ मिमी पावसाची नोंद झाली, असे अधिकाऱ्याने सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड