नाशिक सिटी सेंटर मॉलमध्ये बॉम्ब असल्याच्या खबरीने धावपळ

नाशिक, २१ जुलै २०२३ : शहरातील उंटवाडी रोडवरील एका मॉलमध्ये बाँम्ब ठेवल्याची माहिती मिळताच शहर पोलिसांनी लवाटेनगरमध्ये धाव घेतली. दोन तासांच्या प्रयत्नांनंतर पोलिसांच्या पथकाने बाँम्ब शोधून तो निकामी केला. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. सिटी सेंटर मॉल नेहमी गजबजलेला असतो. मात्र गुरुवारी दुपारी मॉल परिसरास अचानक पोलिसांनी वेढा दिला.

त्यामुळे नागरिकांमध्ये काहीसा गोंधळ व घबराट उडाली होती. पोलिसांच्या शीघ्र कृती दलाने मॉलमधील नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढत बाँम्बचा शोध सुरू केला. श्वान पथकांच्या मदतीने शोध घेत पाकिंगमधील एका वाहनात बाँम्ब असल्याचे निष्पन्न झाले. बाँम्बशोधक व नाशक पथकाने बाँम्ब निकामी केला.

ऐनवेळी उद्भवणाऱ्या दहशतवादी हल्ल्याला तोंड देण्यासाठी पोलिसांसह यंत्रणेची सज्जता तपासणीसाठी, गुरुवारी सिटी सेंटर मॉल येथे मॉकड्रिल करण्यात आले. या मॉकड्रिलमध्ये गुन्हे शाखेचे उपआयुक्त प्रशांत बच्छाव, परिमंडळ एकचे उपआयुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे यांच्यासह शीघ्र कृती दल, दहशतवादविरोधी पथक, अग्निशमन दल आणि जिल्हा रुग्णालयाच्या पथकाने सहभाग घेतला होता.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा