वरंधा घाट ३० सप्टेंबरपर्यंत अवजड वाहतूकीकरता बंद

भोर, २१ जुलै २०२३: पंढरपूर-भोर-महाड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ वरील भोर तालुक्याच्या हद्दीतील वरंधा घाटरस्ता, पावसाळा कालावधीत २२ जुलै ते ३० सप्टेंबर २०२३ पर्यत अवजड वाहतूकीकरिता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. राजेश देशमुख यांनी दिला आहे.

वरंधा घाटातील पुणे जिल्ह्याच्या हद्दीतील रस्ता हा नागमोडी वळणाचा आहे. घाटात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होते. अनेकवेळा घाटात अचानक दरडी कोसळणे, झाडे पडणे, रस्ता खचणे, माती वाहून जाणे अशा घटना घडतात. त्यामुळे संभाव्य जीवितहानी टाळण्याच्या उद्देशाने हा घाटरस्ता अवजड वाहतूकीकरिता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.

जिल्ह्यात भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या ऑरेंज आणि रेड अलर्टवेळी सर्व प्रकारच्या अवजड, मध्यम व हलक्या प्रकारच्या वाहनांच्या वाहतूकीकरिता रस्ता बंद राहील. ऑरेंज आणि रेड इशारा नसलेल्या कालावधीत वरंधा घाटरस्ता, फक्त हलक्या वाहनांच्या वाहतूकीसाठी खुला राहील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा