पुणे, २२ जुलै २०२३ : रायगड जिल्ह्यातील खालापूरच्या इर्शाळवाडी दुर्घटनेस आता दोन दिवस लोटले आहेत.या दुर्घटनेतील मृतांची संख्या २२ वर पोहचली आहे. डोंगरमाथ्यावर असलेल्या या गावात अजूनही बचावकार्य सुरू आहे.१००हुन अधिक लोकांची माहिती अजून मिळालेली नाही. त्यामुळे एनडीआरएफच्या टीमने शनिवारी पुन्हा मदत आणि बचावकार्य सुरु केले आहे.ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांचा शोध घेण्यात येत आहे. या ठिकाणी प्रचंड ढिगारा असल्याने हा ढिगारा हटवण्याचे आव्हान रेस्क्यू टीमसमोर आहे. याआधी नऊ वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातील माळीणमध्ये अशीच दुर्घटना घडली होती. संपूर्ण गावच गडप झाले होते.या घटनेच्या आठवणी पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर राहणाऱ्या लोकांना भयभीत करून रात्री झोपू देत नाही.
इर्शाळवाडी घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील डोंगर कुशीत वसलेल्या नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अजूनही कायम आहे. इर्शाळवाडीच्या दुर्घटनेनंतर हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.पुणे जिल्ह्यातीलआंबेगाव तालुक्यात पसारवाडी येथील नागरिक जीव मुठीत धरून सध्या रहात असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. डोंगर कुशीत वसलेले आदिवासी नागरिक पाऊस सुरू झाला की दरड कोसळण्याच्या भीतीने रात्र रात्र झोपत सुद्धा नाहीत.
या ठिकाणच्या लोकांच्या व्यथा बोलक्या आहेत.पाऊस सुरु झाली की आमच्या मनात भीती निर्माण होते. प्रशासन पाऊस आला की फक्त आमच्याकडे येते. त्यानंतर येत नाही. आमचे अजून पुनर्वसन झालेले नाही. त्याकडे शासनाने पाठ फिरवली असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.या ठिकाणी महिनाभर लाईट नसते, पाणी नसते, अशी तक्रार नागरिकांनी केली. अधिकारी म्हणतात, पुनर्वसन होणार आहे? परंतु कधी होणार. हा प्रश्न नागरिक विचारत आहे. त्याचे उत्तर मिळत नाही. आंबेगाव तालुक्यातील माळीणच्या कुशीत वसलेल्या पसारवाडी मधील नागरिकांमध्ये भीती कायम असल्याचे दिसत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर