पुणे, २२ जुलै २०२३ : पुण्यातील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) संचालक प्रदीप कुरुलकर हनी ट्रॅप प्रकरणात अडकले आहेत. पाकिस्तानी गुप्तहेर महिलेच्या जाळ्यात अडकून त्याने देशातील गोपनीय माहिती इतरांना दिली. या प्रकरणी एटीएसने तपास करुन पुणे न्यायालयात दोन हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. आता तपास संस्थाने पॉलीग्राफ चाचणी आणि व्हाइस लेअर चाचणी करण्याची मागणी एटीएसच्या वकिलांनी केली आहे. या चाचणीला प्रदीप कुरुलकर याच्याकडून विरोध करण्यात आला आहे.
डीआरडीओचा निलंबित संचालक प्रदीप कुरुलकर याच्या व्हाईस लेअर चाचणी आणि सायकोलॉजिकल ॲनलिसिस चाचणीस परवानगीची गरज नाही, असे सरकारी वकिलांनी म्हटले आहे. या चाचणीतून कुरुलकर काय माहिती दडवतोय, ते समोर येणार आहे. या चाचणीत आरोपीविरुद्ध कोणत्याही गोष्टींचा वापर केला जाणार नाही. पॉलीग्रॉफ आणि लाय डिटेक्टर चाचणीला परवानगी हवी असते, असा लेखी युक्तीवाद एटीएसकडून सादर करण्यात आला. आता या विषयावर दोन ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.
प्रदीप कुरुलकर याची व्हाईस लेअर चाचणी आणि पॉलीग्राफ चाचणी करण्याची मागणी तपास संस्थेकडून वकील विजय फरगडे यांनी केली होती. त्यावर दोन्ही चाचण्यांमधील फरक स्पष्ट करण्याचे आदेश न्यायाधीश एस.बी.कचरे यांनी दिले होते. या चाचण्यांना प्रदीप कुरुलकर याने विरोध दर्शवला होता. आता दोन ऑगस्ट रोजी यासंदर्भात न्यायालय निर्णय देणार आहे.
डीआरडीओचे संचालक असलेले प्रदीप कुरुलकर पाकिस्तान हेर झारा दासगुप्ता हिच्या संपर्कात होते. तिला देशातील अनेक गोपनीय माहिती दिली. भारतीय क्षेपणास्त्रांची माहिती दिली. तसेच ब्रह्मोस, अग्नी या क्षेपणास्त्राची गुपिते दिली. मिसाईल लाँचरबाबतही माहिती पाकिस्तानला पुरवली. एटीएस आणि एनआयएने प्रदीप कुरुलकर यांची कसून चौकशी केली. त्यानंतर सुमारे दोन हजार पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. प्रदीप कुरुलकर सध्या येरवडा कारागृहात आहे. आता त्याच्या व्हाईस लेअर चाचणीसंदर्भात न्यायालय काय निर्णय देते, याकडे लक्ष लागले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर