मुंबई, २८ जुलै २०२३ : एक महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंप झाला. ४० समर्थक आमदारांसह आपला स्वतःचा गट घेऊन अजित पवार राष्ट्रवादीतून बाहेर पडले. त्यानंतर ते शिंदे फडणवीस सरकारशी हात मिळवणी करत सरकारमध्ये सहभागी झाले. सत्तेत सहभागी होत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर त्यांच्या समवेत आठ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्या बंडा नंतर दोन्हीही गटांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि पक्ष चिन्हावर दावा करण्यात आला.
यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट या दोन्ही गटांनी शक्ती प्रदर्शन करून, आपल्या समर्थकांच्या बैठकीचे आयोजन केले. त्यामध्ये दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून शपथपत्र भरून घेण्यात आली होती. यानंतर शरद पवार यांनी आपला राज्यवापी दौरा सुरू केला. तर मधल्या काळात शपथविधी झालेल्या आमदारांना खाते वाटप झाले. अधिवेशनाच्या अगोदर अजित पवारांसह सर्व मंत्री शरद पवारांच्या भेटीला आले आणि पवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही दुसऱ्या दिवशी सर्व मंत्री आणि आमदारांच्या गटाने शरद पवारांची भेट घेतली परंतु शरद पवार आपल्या निर्णयावरती ठाम राहिले.
राष्ट्रवादीतील फुटी नंतर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शरद पवार म्हणाले होते की, आम्ही पक्ष आणि पक्ष चिन्हासाठी कोणतीही न्यायालयीन लढाई लढणार नाही. आम्ही जनतेच्या दारात जाऊन आमची भूमिका समजावून सांगू आणि पुन्हा उभारी घेऊ. परंतु दरम्यानच्या काळात शरद पवार यांच्या सहकाऱ्यांकडून निवडणूक आयोगाकडे धाव घेऊन आपली बाजू मांडण्यात आली.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसवर ताबा मिळवण्यासाठी अजित पवार गटाने आता मोठे पाऊल उचलले आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदार आणि जिल्हाध्यक्षांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. आमदारांनी १० हजार आणि जिल्हाध्यक्षांना ५ हजार शपथपत्र भरून देण्याचे आवाहन अजित पवार यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फूटीचे प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगात गेल्यानंतर अजित पवार गटाकडून कागदपत्रांची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर