नवी दिल्ली, ३१ जुलै २०२३ : संसदेच्या अधिवेशनाचा तिसरा आठवडा चालू झाला असून मणिपूरच्या मुद्द्यावरून दोन्ही सभागृहांतील वातावरण तापलेले आहे. सरकार व विरोधकांच्या वार-पलटवाराच्या गदारोळात सरकारकडून विधेयके मांडण्याचा सपाटाही सुरूच आहे. विरोधकांच्या ‘इंडिया आघाडी’मधील २६ पक्षांच्या शिष्टमंडळाने सुटीच्या दिवशी मणिपूरचा दौरा केला. या दौऱ्याबाबतची माहिती इतर नेत्यांना देण्यासाठी संसदेच्या इमारतीमध्ये सकाळी विरोधकांनी खासदारांची बैठक बोलावली आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज एनडीएच्या खासदारांची बैठक पार पडणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सदस्यांना यशाचा कानमंत्र देण्याची शक्यता आहे. एनडीएमधील खासदारांच्या बैठकीचा कार्यक्रम हा ११ दिवसांचा असणार आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकांची रणनिती आखण्यासाठी, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या सर्व खासदारांच्या ३१ जुलै ते १० ऑगस्ट दरम्यान विविध गटांमध्ये बैठकांचं नियोजन करण्यात आलं असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. तर पक्षाने दिलेल्या माहितीनुसार, एनडीएच्या खासदारांचे एकूण ११ गट तयार करण्यात आले आहेत. या ११ गटांपैकी एका दिवसांत दोन गटांची बैठक घेण्यात येणार आहे. आज संध्याकाळी ६.३० वाजता उत्तर प्रदेशच्या खासदारांसोबत पहिली बैठक सुरू होणार आहे. तर दुसरी बैठक ही आजच रोजी संध्याकाळी ८.३० वाजल्यापासून सुरु होणार आहे.
मणिपूरच्या विषयावरून संसदेतच नाही, तर पश्चिम बंगालच्या विधानसभेतही गदारोळ सुरू आहे. तृणमूल काँग्रेस पक्षाने या हिंसाचाराच्या विरोधात ठराव आणला आहे. तृणमूल काँग्रेसचे मुख्य प्रतोद निर्मल घोष यांनी सांगितले की, आम्ही पावसाळी अधिवेशनात ईशान्य भारतातील राज्यांमध्ये आलेल्या मानवतेवरील संकटावर चर्चा करणार आहोत. तर सभागृहात भाजपा या ठरावाला विरोध करणार असल्याचे भाजपाचे नेते सांगत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे