नवी दिल्ली, ७ ऑगस्ट २०२३ : काँग्रेस खासदार रजनी पाटील यांच्यावरील निलंबनाची कारवाई राज्यसभा सभापतींनी मागे घेतली आहे. त्यांच्यावर सभागृहातील विरोधकांच्या गोंधळाचा एक व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप होता. या प्रकरणी त्यांना राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनी १० फेब्रुवारी रोजी निलंबित केले होते. रजनी पाटील ह्या काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या विश्वासू खासदार म्हणून ओळखल्या जातात.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात केलेल्या भाषणादरम्यान विरोधकांनी गोंधळ घातला होता. सभागृहातील या गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामुळे रजनी पाटील यांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. रजनी पाटील यांना दबावामुळे निलंबित केल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लीकार्जून खरगे यांनी केला होता.
विशेषाधिकार समितीने आज खासदार रजनी पाटील यांच्यावरील कारवाई मागे घेण्याचा प्रस्ताव ठेवला. सभागृहात व्हिडिओ शूट केल्याने पाटील यांनी विशेषाधिकाराचे उल्लंघन केले आहे. या प्रकरणी त्या दोषी आहेत. चार महिन्यांपासून त्या निलंबित आहे. त्यांचे आत्तापर्यंतचे निलंबन ही शिक्षा मानली जावी, असे समितीने म्हटले. राज्यसभा सभापतींनी निलंबन मागे घेतल्यानंतर रजनी पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, मी आता सभागृहाच्या मर्यादेनुसार काम करेन.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर