शाळांना पूर्वसुचना न देता अचानक ऑडिटला येण्याचे फर्मान, शिक्षणक्षेत्रात खळबळ

पुणे, ११ ऑगस्ट २०२३ : पुरंदर तालुक्यातील सर्व खाजगी,अनुदानित व जिल्हा परिषदेच्या शाळेतील शालेय पोषण आहार योजनेचा लाभ घेणाऱ्या शाळांचे लेखापरीक्षण(ऑडिट)होणार आहे.त्यामुळे पुरंदरच्या प्रशासनाने आज (दि.११ऑगस्ट) सकाळी ९:३० वा. कसलीही पूर्वकल्पना न देता उपस्थित राहण्याच्या सुचना गुरुवारी (१०ऑगस्ट) दुपारी चार वाजता व्हाट्सअपद्वारे सर्व मुख्याध्यापकांना दिल्या. सदर मेसेज अनेक मुख्याध्यापकांनी शाळा सुटल्यावर घरी पोहचल्यावर संध्याकाळी पाहिले.

ऑडिट करण्यासंदर्भात पुरंदरच्या प्रशासनाला वरिष्ठ कार्यालयाने पूर्व कल्पना देऊन देखील पुरंदरच्या शिक्षण विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले.व काल संध्याकाळी अचानक निरोप दिले. यामुळे सदर ऑडिट रद्द करुन पुढे ढकलण्यात यावे, यासाठी शिक्षक प्रतिनिधींनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. यावर सदर लेखा परीक्षण हे शिक्षण संचालनालय यांचेमार्फत होणार असून यावेळी उपस्थित न राहिल्यास शिक्षकांवर कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले.

जिल्हा परिषदेकडून पुरंदरच्या प्रशासनास सदर ऑडिटची पूर्वकल्पना(४ ऑगस्ट) लेखी दिली होती. तरी देखील पुरंदरच्या प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले व काल ४ वाजता अचानक निरोप देवून शिक्षकांना धावपळ करायला लावले, शिक्षकांची मानसिकता बिघडवण्याचा प्रयत्न झाला, असे प्रकार पुरंदरमध्ये घडल्यामुळे प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. ही बाब गंभीर असल्याने शिक्षक संघटनांनी थेट पुरंदरचे गटशिक्षणाधिकारी निलेश गवळी यांच्याशी संपर्क साधला व त्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. दोषी अधिकारी किंवा कर्मचारी यांच्यावर कारवाईची मागणी केली. आता पुरंदरमध्ये प्रशासन विरुद्ध मुख्याध्यापक आमनेसामने आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

वरिष्ठांकडून पुरंदर पंचायत समितीला याबाबत ४ ऑगस्ट रोजी सूचना प्राप्त झाल्याचे पत्र देखील व्हायरल झाले आहे. त्यामुळे सदर सुचना मुख्याध्यापकांना यापूर्वीच का देण्यात आल्या नाहीत? सुचना विलंबाने देण्यास जबाबदार कोण ? याबाबतीची चौकशी करुन दोषींवर कारवाई व्हावी. अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे सल्लागार महादेवराव माळवदकर पाटील, पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष सुनीलतात्या कुंजीर, पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संदीप कदम, पुणे जिल्हा पदवीधर शिक्षक संघटनेचे जिल्हा सरचिटणीस वसंतराव कामथे यांनी पुरंदरचे गटशिक्षणाधिकारी निलेश गवळी यांच्याकडे केली.

तसेच गेल्या ८ ते १० वर्षांपासूनचे ऑडिट तपासणी करण्यासाठीचे रेकॉर्ड शिक्षकांनी आपल्या शाळांवर जाऊन आज शोधायचे, परत पंचायत समिती सासवड येथे आणायचे, त्या बाबतची ८ ते १० वर्षांपासूनच्या रेकॉर्डच्या झेरॉक्स काढणे हे काम अचानक मेसेज दिल्यामुळे अवघ्या काही तासांत पूर्ण होवूच शकत नाही. त्यामुळे प्रशासनाच्या हलगर्जीपणा व दुर्लक्षितपणामुळे, मनमानी पद्धतीने,अधिकाराचा दुरुपयोग करुन,शिक्षकांना धाकदडपशाही करुन,भिती दाखवून, घाईगडबडीत ऑडिट उरकून घेण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. मात्र आजचे ऑडिट रद्दच व्हावे, तसेच हे ऑडिट १५ ऑगस्ट नंतर घ्यावे, अशी मागणी संघटना प्रतिनिधींकडून करण्यात आली आहे.

आजची ऑडिट रद्द करण्याची मागणी प्रशासनाने मान्य करावी अन्यथा प्रशासनाने ऑडिट करण्याचा हट्ट पूर्ण केला तर, या सर्व बाबींची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी वरिष्ठांकडे करण्यात येईल, अशी माहिती यावेळी शिक्षक संघटना प्रतिनिधींनी दिली. दरम्यान आज (११ ऑगस्ट) सर्व शाळांचे मुख्याध्यापक, जिल्हा परिषद च्या सर्व शाळा त्याचबरोबर खाजगी अनुदानित शालेय पोषण आहार योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व शाळांना आज (११ऑगस्ट) होणाऱ्या ऑडिट संदर्भात कळविण्यात आले आहे. सकाळी ९.३० वाजता सर्व शाळांना ऑडिटसाठी बोलावले होते. सदरचे ऑडिट आजच्या ऐवजी २४ ऑगस्टला घेण्यात येईल असे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा