जगातील सर्वात उंच पर्वतरांगा….!

पर्वतीय प्रदेशांचा जगाच्या शाश्वत विकासामध्ये असलेला महत्त्वाचा सहभाग दर्शवण्यासाठी अनेकदा पर्वत रांगाचा उपयोग केला जातो.नुकताच आपण भारतात जागतिक पर्वत दिन साजरा केला. त्यानिमित्त जाणून घेऊ जगातील सर्वात उंच पर्वतरांगा…

माउंट एव्हरेस्ट : हे जगातील सर्वात उंच पर्वतशिखर आहे. हिमालय पर्वतातील ह्या शिखराची उंची ८८४८ मीटर (२९,०२९,फूट) इतकी असून ते नेपाळ व चीन (तिबेट) या देशांच्या सीमेजवळ आहे. नेपाळमध्ये याला सगरमाथा म्हणून ओळखतात, तर तिबेट मध्ये चोमो लुंग्मा म्हणतात.

के 2 : याची उंची ८६११ मीटर इतकी आहे. हे शिखर सध्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहे. पाक-चीनच्या सरहद्दीजवळ आहे. गिर्यारोहकांमध्ये के २ पर्वताला जंगली मानले जाते, कारण चढाईसाठी हे शिखर जगातील सर्वात अवघड शिखर मानले जाते. आकडेवारीनुसार या पर्वतावर गिर्यारोहण करणारे ४ पैकी १ गिर्यारोहकाचा मृत्यू होतो.

कांचनगंगा: हे हिमालय पर्वतांतील एक उंच पर्वतशिखर आहे. हे जगातील माउंट एव्हरेस्ट व के२ नंतरचे तिसरे सर्वात उंच शिखर असून भारताच्या सिक्कीम राज्यात आहे. भारतातील सर्वोच्च शिखर आहे. त्याची उंची ८५८६ मीटर (२८,१६९ फूट) इतकी आहे.

ल्होत्से : हा पृथ्वीवरचा चौथा अत्युच्च पर्वत असून तो दक्षिण कोलमार्गे माउंट एव्हरेस्टला जोडलेला आहे. ल्होत्सेचे सर्वोच्च शिखर समुद्रसपाटीपासून ८५१६ मीटर आहे. ल्होत्से पर्वत तिबेट व नेपाळचा खुम्बू भागाच्या सीमेवर आहे.

मकालू : हे हिमालयातील एक शिखर आहे. त्याची उंची ८४६३ मीटर असून ते जगातील पाचव्या क्रमांकाचे उंच शिखर आहे. हे शिखरदेखील ‘माउंट एव्हरेस्ट’च्या हिमालयीन रांगांमध्ये वसलेले आहे.

चो ओयू : हे हिमालय पर्वतरांगेतील एक उंच शिखर आहे. त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ८२०१ मीटर असून, हे पृथ्वीवरील ६ व्या क्रमांकाचे उंच पर्वत शिखर आहे.

धवलगिरी : हे हिमालय पर्वतरांगेतील एक उंच (उंची ८१६७ मीटर) शिखर आहे. इ.स. १९६० साली स्विस, ऑस्ट्रियन व नेपाळच्या संयुक्त मोहिमेने हे ‘माउंट धौलागिरी’ वा ‘माउंट धवलगिरी’ शिखर सर केले.

मानसलू : हिमालयातले मानसलू (उंची ८१६३ मीटर) हे जगातील ८ व्या क्रमांकाचे उंच शिखर आहे. हे शिखर पश्चिम नेपाळमध्ये आहे. या शिखराचे नाव संस्कृत भाषेतील आहे. स्थानिक नागरिक ‘मानसलू’ला ‘कुटांग’ असेही म्हणतात.

नंगा पर्वत : हा जगातील सर्वोच्च पर्वतांच्या यादीतील ९ व्या क्रमांकाचा पर्वत आहे. त्याच्या शिखराची उंची ८१२६ मीटर इतकी आहे. हे शिखर पूर्वी अतिशय खडतर मानले जात असे.

अन्नपूर्णा : हिमालयातील ५५ किमीच्या अन्‍नपूर्णा पर्वतरांगेतील अन्नपूर्णा १ – उंची ८०९१ मी. हे सर्वोच्च शिखर आहे. हे मध्य नेपाळमध्ये आहे.

एक प्रतिक्रिया

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा