वॉशिंग्टन, २५ ऑगस्ट २०२३ : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांच्यावर या वर्षातील चौथा गुन्हा दाखल झाला असून पहिल्यांदाच ते अटकेच्या कारवाईला सामोरे गेले आहेत. जॉर्जियातील २०२० च्या अध्यक्षीय निवडणुकीच्या निकालात हस्तक्षेप केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणात गुरुवारी त्यांनी आत्मसमर्पण केले. त्यामुळे फुल्टन काऊंटी तुरुंग प्रशासनाने त्यांना अटक केली. अटक झाल्यावर जेलमध्ये ट्रम्प यांचा कैद्यासारखा फोटो देखील काढण्यात आला. पण वीसच मिनिटांत त्यांना दोन लाख डॉलर्सच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला आहे.
ट्रम्प हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत ज्यांनी त्यांना मुगशॉट कैदी म्हणून घेतले आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ट्रम्प यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले. मी काही चुकीचे केले नाही. जॉर्जियामधील अध्यक्षीय निवडणुकीचे निकाल उलथवून लावण्यासाठी ट्रम्प यांच्यावर फसवणूक, घोटाळेबाजी आणि बनावटगिरी केल्याचा आरोप आहे. त्याच्याशिवाय या प्रकरणात आणखी १८ जणांना आरोपी करण्यात आले आहे.
गेल्या पाच महिन्यामध्ये ही चौथी क्रिमिनल केस आहे ज्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना दोषी ठरवण्यात आले आणि गुन्हेगार म्हणून न्यायालयात हजर व्हावं लागलं आहे. कोर्टाने ट्रम्प यांना २५ ऑगस्टपर्यंत शरणागतीची मुदत दिली होती. डोनाल्ड ट्रम्प गुरुवारी फुल्टन काउंटी तुरुंगात आले आणि त्यांनी शरणागती पत्करली. शरणागती पत्करल्यानंतर २० मिनिटांसाठी ते जेलमध्ये होते. या दरम्यान त्यांचा मग शॉट Criminal Mugshot म्हणजे कैद्यासारखा फोटो देखील काढण्यात आला. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत हा फोटो देखील शेअर केला आहे.
जॉर्जिया क्रिमिनल केस काय आहे
२०२० मध्ये अध्यक्षीय निवडणुकीनंतर ट्रम्प यांच्यावर निकाल उलटवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला. बीबीसीच्या म्हणण्यानुसार, २ जानेवारी २०२१ रोजी ट्रम्प आणि जॉर्जियाचे निवडणूक अधिकारी ब्रॅड राफेनस्परगर यांच्यात सुमारे तासभर फोन झाला होता. ३ जानेवारी रोजी दुपारी २:४१ वाजता व्हाईट हाऊसच्या कार्यालयातून हा कॉल करण्यात आला होता.
ट्रम्प यांनी फोनवर रॅफेनस्परगरला सांगितले की त्यांनी मतांची पुनर्मोजणी करावी जेणेकरून राज्याची १६ इलेक्टोरल मते त्यांच्याकडे गेली. कॉल रेकॉर्डिंग प्रथम वॉशिंग्टन पोस्टने प्रकाशित केले होते. त्यानुसार मला फक्त ११,७८० मते हवी आहेत, असे ट्रम्प म्हणाले होते. विजयाच्या फरकापेक्षा हे एक मत जास्त आहे. यादरम्यान ट्रम्प यांनी रॅफेनस्परगरचे ऐकले नाही तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची धमकीही दिली.
गेल्या वर्षी, एका विशेष ग्रँड ज्युरीने या खटल्यात अनेक महिन्यांत ७५ साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. अमेरिकेतील २०२४ च्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार असू शकतात. सातत्याने गुन्हे दाखल होत असतानाही त्यांची लोकप्रियता कमी झालेली नाही. तसेच ट्रम्प यांच्यावर आणखी १९ प्रकरणे दाखल आहेत. ट्रम्प यांच्यावर पॉर्न स्टारला गप्प करण्यासाठी पैसे देण्याबाबत, गुप्तचर कागदपत्रे व्हाईट हाऊसमधून घरी नेल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी काही प्रकरणांमध्ये त्यांच्यावर राष्ट्रपती असताना गैरवर्तनाचा आरोप आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे