मुंबई, २६ ऑगस्ट २०२३: बॉलिवूड इंडस्ट्रीतून एक वाईट बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ गीतकार देव कोहली यांचे आज, शनिवारी पहाटे ४ वाजता झोपेत निधन झाले. गीतकार देव कोहली यांनी वयाच्या ८१ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. देव कोहली वयाशी संबंधित आजारांशी झुंज देत होते. त्यामुळे त्यांना नुकतेच अंधेरी येथील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दोन-तीन महिने दाखल करण्यात आले होते.
देव कोहली १० दिवसांपूर्वी रुग्णालयातून घरी परतले होते. देव कोहली यांचे आज दुपारी २ वाजता मुंबईतील ज्युपिटर अपार्टमेंट, ४थी क्रॉस लेन, लोखंडवाला कॉम्प्लेक्स या निवासस्थानी अंतिम दर्शन घेतले जाईल. त्यानंतर देव कोहलीच्या पार्थिवावर आज संध्याकाळी ६ वाजता ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. देव कोहलीच्या निधनाच्या वृत्ताने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.
देव कोहली यांनी ‘लाल पत्थर’, ‘बाजीगर’, ‘मैने प्यार किया’, ‘जुडवा ३’, ‘शूट आउट एट लोखंडवाला’, ‘हम आपके है कौन’ आणि ‘मुसाफिर’ यांसारख्या १०० हून अधिक चित्रपटांमध्ये गीतकार म्हणुन काम केले आहे. पाकिस्तानातील रावळपिंडी येथे जन्मलेल्या देव कोहली यांनी आनंद राज आनंद, अन्नू मलिक, राम लक्ष्मण, आनंद मिलिंद या संगीतकारांसोबत काम केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड