पुणे, १ सप्टेंबर २०२३ : सिरम इन्स्टिट्यूट तर्फे लवकरच डेंग्यू आणि मलेरियावरील लस विकसित केली जाणार आहे. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सायरस पुनावाला यांनी याबाबत माहिती दिली आहे. मलेरियावरील लस केवळ भारतातच नाही, तर आफ्रिकेसाठीही उपयुक्त ठरणार आहे. कोरोना काळात कोव्हिशिल्डच्या रुपाने सिरम इन्स्टिट्यूटने जगाला दिलासा दिला. आता, कीटकजन्य आजारांवरील लस विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे.
सिरम इन्स्टिट्यूटमधील शास्त्रज्ञ गेल्या काही वर्षांपासून या लसीबाबत संशोधन करत होते. त्यांच्या प्रयत्नांना आता यश आले आहे. डेंग्यूची लस वर्षभरात उपलब्ध होईल. तर मलेरियाच्या लसीसाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. पावसाळ्यात डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांचा प्रादुर्भाव होतो. या आजारांवर लस उपलब्ध झाल्यास नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळू शकेल.
सायरस पुनावाला यांनी डेंग्यूची लस वर्षभरात आणणार असल्याची घोषणा केली. या लसीमुळे डेंग्यूचे चारही प्रकार बरे होण्याची खात्री असेल. आता सिरम इन्स्टिट्यूट लवकरच लस बाजारात आणण्याच्या दिशेने पावले उचलत आहे. या लसीमुळे महिलांच्या गर्भाशयावर कोणताही परिणाम होणार नाही, असेही सायरस पुनावाला यांनी सांगितले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर