मुंबई, ७ सप्टेंबर २०२३ : शिवसेना ठाकरे गट माजी नगरसेवक सुधीर मोरे आत्महत्येप्रकरणी वकील नीलिमा चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. शिवसेना ठाकरे गट रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख सुधीर सयाजी मोरे यांनी, गुरूवारी ३१ ऑगस्टला घाटकोपर आणि विद्याविहारदरम्यान रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली होती. याप्रकरणी सुधीर मोरे यांच्या मुलाने नीलिमा चव्हाण यांनी वडिलांचा छळ केल्याचा आरोप करत रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल केला होता.
नीलिमा चव्हाण यांनी सुधीर मोरे यांना मानसिक त्रास दिल्याचा दावा पोलिसांनी न्यायालयात केला आहे, तर नीलिमा चव्हाण यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली होती. पण, निलिमा चव्हाण यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला आहे. माझ्याशी संबंध ठेवले नाहीतर आयुष्य संपवेन, अशी धमकी निलीमा चव्हाण यांनी सुधीर मोरे यांना दिली होती. मोरेंनी बोलणे बंद केल्यावर ब्लॅकमेल करण्याचे काम नीलिमा चव्हाण करत होत्या. आत्महत्येपूर्वी नीलिमा चव्हाण यांनी मोरेंना ५६ वेळा फोन केला होता, अशी माहिती तपासात उघड झाली आहे. दरम्यान सुधीर मोरे यांना व्हॉट्सअॅपवर मेसेज, ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल्स करण्यात आले होते. मोरेंनी चव्हाण यांना छळवणूक थांबवण्याची विनंती केली होती. पण, कोणतीही दया निलीमा चव्हाण यांनी दाखवली नाही, अशी बाजू सरकारी वकील इक्बाल सोलकर यांनी पोलिसांतर्फे मांडली आहे.
नेमके प्रकरण काय?
शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मुंबईतील खंदे समर्थक तथा माजी नगरसेवक सुधीर मोरे यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत गुरूवारी आढळला. घाटकोपर रेल्वे स्थानकालगतच्या रुळावर त्यांचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला. त्यामुळे त्यांनी लोकलपुढे उडी मारून आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला. त्यांच्या आत्महत्येमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. मात्र, त्यांना महिलेकडून धमक्या येत असल्याने त्यांनी पाऊल उचलले अशी माहिती समोर येत आहे. सुधीर मोरे यांना गत काही महिन्यांपासून कुणीतरी ब्लॅकमेल करत होते. त्यातूनच त्यांनी आत्महत्येसारखे गंभीर पाऊल उचलले. त्यांनी २ महिन्यांपूर्वीच काही कॉल रेकॉर्ड करण्यासाठी एक नवा मोबाईल खरेदी केला होता. हा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घ्यावा, अशी मागणी त्यांच्या निकटवर्तीयांनी केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे